विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिरूर/पुणे : दि. २१/०८/२०२३.
खुनाला दहा वर्षे होऊनही डॉ नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी मोकाट असून त्यांच्यावर कारवाई होत नाही. मात्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दहा वर्षे सतत केलेल्या आंदोलन उपक्रमामुळे दाभोलकरांच्या मारेकऱ्यांची विचारधारा, संघटना आणि त्यांचे पाठीराखे कोण आहेत, याची जाणीव सर्व जगाला झाली आहे, असे सरकार, तपास यंत्रणेला सूचित करत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना आणि त्यांच्या सूत्रधारांना अटक करून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त एस एम जोशी सभागृह येथे विवेक निर्धार मेळावा झाला. यावेळी अविनाश पाटील बोलत होते. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉ. राम पुनियानी, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, रझिया पटेल, महा.अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष माधव बागवे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इतिहासात राजा किंवा नेता मारला गेला की राज्य, पक्ष किंवा संघटना संपून जाते. परंतु, महा. अंनिसच्या बाबतीत तसे घडले नाही. डॉ. दाभोलकरांच्या खूनाला दहा वर्षे होऊनही संघटनेचे काम थांबले नाही. संघटना ताकदीने उभी राहिली. या सारखे देशात मागील पन्नास वर्षाच्या काळात दुसरे उदाहरण नाही, असेही अविनाश पाटील म्हणाले.
यावेळी डॉ. पुनियानी म्हणाले की, ‘कुठलाही धर्म धोक्यात नसतो, धोक्यात असते ती काही लोकांची सत्त्ता. ज्याला ते धर्माच्या आधारे मिळवतात. स्वातंत्र्य लढ्यात फुले, गांधी, नेहरू, आंबेडकरांनी वैज्ञानिक दृष्टी असलेली समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही मूल्य आपणाला दिली. याच्या विरोधात दुसऱ्या बाजूला धर्म, द्वेष आणि विषमतेवर आधारित मूल्यांचा प्रसार करण्यात आला. डॉ. दाभोलकरांचा खून देखील अशी मूल्य जपणाऱ्या विचारसरणीतुन करण्यात आला आहे’.
हेमंत देसाई आपल्या मनोगतात म्हणाले की ‘देशात धर्म आणि राजकारण यांची युती झाली आहे. यातून धर्मवादास पाठबळ दिले जात आहे. सरकारे केवळ सन साजरे करण्यासाठी स्थापना झाली आहेत का? सत्य आणि अहिंसा ही कचऱ्यात टाकलेली मूल्य बनली आहेत. ती रुजविण्यासाठी शंभर दाभोलकरांची गरज आहे.’
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय बनसोडे यांनी केले तर सूत्रसंचालन विशाल विमल यांनी केले. यावेळी कार्यकर्त्यांनी पुढील वर्षभरात करण्यात येणाऱ्या कामांचे निर्धार व्यक्त केले. विजय नांगरे, अनिल करवीर, भास्कर सदाकळे, निर्मला माने, अमोल वाघमारे, प्रतीक जाधव, केशव कुदळे यांनी गाणी सादर केली. घनश्याम येणगे यांनी आभार मानले.