विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिरूर/पुणे : दि. २१/०८/२०२३.
‘दहा वर्षे खुनाची – कार्यरत विवेकी असंतोषाची’, ‘माणूस मारता येतो – विचार नाही’, ‘बेपर्वा सरकार – धिक्कार धिक्कार’ असे फलक झळकवत पुण्यात ऑगस्ट २०२३ रोजी मोर्चा काढण्यात आला होता. अंनिसच्या कार्यकर्त्यानी या मुकमोर्चातून आपला असंतोष व्यक्त केला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या दहा वर्षानंतरही आरोपींवर कारवाई होऊ न शकल्याने, अंनिसच्या कार्यकर्त्यानी या मोर्चामध्ये सरकार आणि तपास यंत्रणेच्या धिक्काराचे पोस्टर प्रदर्शित केले.
२० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. दाभोलकरांचा गोळ्या घालून खून करण्यात आलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलापासून, एस एम जोशी सभागृहापर्यन्त हा मूकमोर्चा काढण्यात आला होता. त्याअगोदर पुलावर स्मृतिजागर हा कार्यक्रम झाला. यात गाणी, घोषणा आणि मनोगताद्वारे दाभोलकरांना अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष माधव बावगे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे आणि विविध संस्था संघटनांचे बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून कोणत्या विचारसरणीच्या लोकांनी केला हे सर्वांना माहित आहे. तरीही सनातन संस्थेचे अध्यक्ष जयंत आठवले यांना अटक का केली जात नाही. ज्यांना अटक केले होते ते जामीनावर बाहेर मोकाट फिरत आहेत. तपास यंत्रणाकडून संदिग्धता का ठेवली जातेय ? असा प्रश्न अविनाश पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. गाणी, घोषणा, घोषवाक्यांच्या माध्यमातून विद्वेषाला प्रेमाने उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक सावळे यांनी केले. तर समारोप विशाल विमल यांनी केला.