शिंदे गटाला केंद्रात तीन मंत्रीपदे मिळणार; श्रीरंग बारणे यांची वर्णी लागण्याची शक्यता!

दि. १९/०१/२०२३

प्रसन्न तरडे

पिंपरी

 

पिंपरी : महाराष्ट्रातील शिवसेनेच्या शिंदे गटाला केंद्र सरकारमध्ये प्रतिनिधित्व दिले जाणार असून एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपदे दिली जाणार असल्याचे वृत्त आहे. यामध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे, तसेच राहुल शेवाळे आणि प्रतापराव जाधव यांची या पदावर वर्णी लागणार असल्याचे समजते.

शिवसेनेपासून फारकत घेऊन शिंदे गटाने भाजपशी घरोबा केल्याला आता सुमारे सहा महिने झाले आहेत.  या गटातील अनेक आमदार मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. भाजप नेते सध्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या मनस्थितीत नाहीत. यामुळे शिंदे गटात नाराजी पसरली आहे. बच्चू कडूं सारख्या शिंदे गटाच्या सहयोगी नेत्याने आपली नाराजी उघड उघड बोलून दाखवली आहे. त्यामुळे शिंदे गटातील नाराज नेत्यांना शांत करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी एक नवीन शक्कल काढली असून केंद्रात एक कॅबिनेट मंत्री आणि दोन राज्यमंत्रीपदे शिंदे गटाला देण्याची तयारी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दर्शविली असल्याचे समजते.

यामुळे शिंदे गटाची नाराजी काही अंशी दूर होईल असे भाजप नेत्यांना वाटत आहे. सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटविरुद्ध ठाकरे गट अशा दाखल असलेल्या याचिका; याशिवाय शिंदे गटावर अपात्र ठरण्याची असलेली टांगती तलवार यामुळे भाजप नेते राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा धोका पत्करण्यास तयार नाहीत असे समजते. राजकीय वर्तुळात सध्या सुरू असलेली चर्चा पाहता या मंत्रिपदावर राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे यांची वर्णी लागणार असल्याचे समजते. यापैकी श्रीरंग बारणे यांनी मागील लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला असल्यामुळे ते ’जायंट किलर’  मानले जातात. याशिवाय त्यांचे केंद्रातील भाजप नेत्यांशी पूर्वीपासूनच निकटचे संबंध आहेत. तर राहुल शेवाळे आणि प्रतापराव जाधव हे ठाकरे गटावर टीका करण्यात अग्रेसर असल्याने त्यांची वर्णी मंत्रिमंडळात लावली जाणार असल्याचे कळते. केंद्रात यापूर्वीच मंत्री असलेले महाराष्ट्रातील वजनदार नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे गटावर विरुद्ध जी आघाडी उघडली आहे; तिला या तिघांच्या रूपाने रसद पुरविली जाणार असून यापुढे पूर्वाश्रमीच्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांच्या गटाविरुद्ध वापरून काट्याने काटा काढण्याचा डाव भाजप नेतृत्वाचा असल्याचे दिसून येत आहे

याशिवाय राहुल शेवाळे यांना मंत्रीपद देऊन मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याची जबाबदारी त्यांना दिली जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *