लंडन येथे शिक्षण घेत असतानाही पुणेकरांचा छ. शंभूराजांच्या कार्याचा ध्यास

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिरूर : दि. २२/०३/२०२३.


भारतात (India) असणाऱ्या मराठी भाषिकांचे म्हणजेच मराठ्यांचे राज्य म्हणून महाराष्ट्र जगात प्रसिद्ध आहे. याच राज्यातील शुरवीरांचा जिल्हा म्हणून पुणे जिल्हा व त्यात जन्मलेले मराठ्यांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या जगाला ज्ञात आहेत. त्यांचा पराक्रम व सर्व जाती धर्म सहिष्णुता सर्वपरिचित आहे. त्यांचेच सुपुत्र म्हणजे छत्रपती संभाजी महाराज (शंभूराजे) यांचा इतिहास मात्र म्हणावा इतका शालेय अभ्यासक्रमात व उच्य शिक्षणात नसल्याची उणीव अनेकजण बोलून दाखवतात. २१ मार्च म्हणजे शंभूराजांची पुण्यतिथी. याच दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वकीयांच्या राज्याचा वारसा, शंभूराजांनी नेटाने पुढे यशस्वीपणे चालवलेला होता. परंतु अनेक स्वकीय व परकीय गद्दारांनी त्यांना शह देण्याचा प्रयत्न केला. त्यांना षडयंत्रांमध्ये अडकवून त्यांचे हाल हाल केलेले होते. त्यांचा खोटा इतिहास रचून त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता. शंभू राजांना अल्प आयुष्य मिळाले होते. तरीदेखील स्वराज्यासाठी त्यांनी परकियांना आपल्या शुरतेने सळो की पळो करून सोडले होते. परंतु अलीकडे संभाजी राजांचा इतिहास अनेक इतिहासकारांनी व तरुणांनी जागृत करण्याचा प्रयत्न केलाय. त्यांचा इतिहास जगभर प्रसिद्ध व्हावा, माहीत व्हावा असाच अनेकांचा प्रयत्न आहे.
त्याच पार्श्वभूमीवर लंडन येथे शिकणाऱ्या पुणेकर भारतीयांनी, भारताचे केंद्रीय मंत्री अमिषजी त्रिपाठी यांच्याकडे, लंडन येथील एका कार्यक्रमात या संदर्भात मागणी करत पाठपुरावा सुरू केलाय.

 


पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याचे भाजप चे माजी दिवंगत आमदार, कै. बाबुराव काशिनाथ पाचर्णे यांचे नात्याने नातू असलेले , चि. पृथ्वीराज राजेंद्र चव्हाण हे सध्या लंडन येथे MBA चे उच्च शिक्षण घेत असून, येथील नेहरू सेंटर मधील “भारतीय उच्यायुक्तालयात” महाराष्ट्र मंडळाच्या एका कार्यक्रमासाठी, भारताचे केंद्रीय मंत्री अमिष त्रिपाठी आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार येणाऱ्या ३९३ व्या जयंतीनिमित्त त्यांनी सर्वांना संबोधित केले. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांची भेट घेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त, माजी आमदार कै. बाबुराव पाचर्णे यांच्या स्मरणार्थ स्मृतिचिन्ह भेट दिली. यावेळी पृथ्वीराज यांचे भारतीय मित्र पुनीत वसंथा व अन्य मित्रमंडळी उपस्थित होते. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट / संघर्षगाथा इतिहासातून व अभ्यासक्रमातून जगासमोर आणण्याचा प्रस्ताव पृथ्वीराज यांनी मंत्रीमहोदयांसमोर मांडला. हा प्रस्ताव मांडताना चिं. पृथ्वीराज यांनी त्यांचे आजोबा व शिरूर हवेलीचे भाजप चे माजी आमदार कै. बाबुराव पाचर्णे यांनी, त्यांच्या आमदारकीच्या कालावधीत छत्रपती संभाजी महाराजांच्या शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथे असणाऱ्या समाधी व परिसर सुशोभिकरणासाठी मोठा निधी मंजूर केल्याचे, तसेच कोरेगाव भीमा दंगलीच्यावेळीही समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी तेथे तळ ठोकून सर्व परिस्थिती हाताळल्याचे सांगत, अनेक आठवणी मंत्री महोदयांसमोर उजागर केल्या.
केंद्रीय मंत्री अमिषजी त्रिपाठी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या रास्त मागणीला दुजोरा देत, तसेच समक्ष भेटून छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाला अमर करण्यासाठी कार्यवाही करण्याचे आश्वासन देत त्यांना विशेष वेळ दिलीय.
यावेळी महाराष्ट्र सदन मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमास शेकडो भारतीय उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण हे, शिरूर तालुका भाजप चे प्रचार व प्रसिद्धी प्रमुख राजाभाऊ श्रिकिसन चव्हाण व शिरूर तालुका भाजपा महीला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. वैजयंती राजाभाऊ चव्हाण या उभयतांचे चिरंजीव आहेत. या उभयतांनीही आपल्या चिरंजीवांच्या या लोकाभिमुख व चांगल्या मागणीचे कौतुक केलेय. शिवाय शिरूर तालुक्यातील अनेकांनी या मागणीचे स्वागत केलेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *