चिंचवडच्या पोटनिवडणुकीचे कमी वेळात उत्तम नियोजन; अजितदादांकडून पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे कौतुक

अजितदादांकडून पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे कौतुक

पिंपरी, दि. 10 ( प्रतिनिधी )  –
चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना नियोजनासाठी आणि प्रचारासाठी अत्यंत कमी वेळ मिळाला. असे असतानाही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्तम नियोजन केले. पुढील निवडणुकीमध्ये आपला विजय नक्की असून खचून न जाता नव्या जोमाने कामाला लागा, अशा शब्दात अजित पवार यांनी महाविकास आघाडी व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना लाखाच्या आसपास मते मिळाली. गत वेळच्या निवडणुकीपेक्षा तब्बल ६० हजार मते अधिकची खेचण्यात पक्षाच्या कायकर्त्यांना यश आले. मात्र अगदी थोड्या फरकाने यशाने हुलकावणी दिली. अपक्ष उमेदवारामुळे महाविकास आघाडीतील मतांची फाटाफुट झाली. या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते व नगरसेवकांनी आज ( दि.10 ) रोजी विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, माजी नगसेवक संतोष कोकणे, विनोद नढे, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष अविनाश गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. अजित पवार यांनी पोटनिवडणुकीत पडलेल्या मतांसह प्रभागनिहाय व बुथनिहाय माहिती यावेळी घेतली. उपस्थितांना मागदर्शन करताना अजित पवार म्हणाले, पोटनिवडणुकीसाठी आपल्याला अत्यंत कमी वेळ मिळाला. कमी वेळातही निवडणुकीचे अत्यंत उत्तम नियोजन करण्यात व मोठी मते मिळविण्यात सर्वांच्या कष्टामुळे यश मिळाले. विजय-पराजय हे निवडणुकीत होतच असतात. मात्र,आपल्याला मिळालेली मते ही आपला  विश्वास द्विगुणीत करणारी आहेत. त्यामुळे खचून न जाता येणार्‍या प्रत्येक निवडणुकीत यश मिळविण्याच्या दृष्टीने आतापासून तयारीला लागा.
अधिवेशन संपल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये आपण बैठक घेणार असून त्यावेळी पुढील निवडणुकांच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल. आपण राज्य शासन, महापालिकेच्या माध्यमातून केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या कामाला आतापासूनच लागा. पुढील निवडणुकांमध्ये मतदार आपल्यालाच संधी देतील आणि आपला विजय होईल, असा विश्वासही पवार यांनी यावेळी बोलून दाखविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *