रवींद्र खुडे
विभागीय संपादक
१० फेब्रुवारी २०२२
शिरूर
शिरूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती प्रवीण चोरडिया यांनी राजीनामा दिल्याने, रीक्त झालेल्या पदावर प्रा. सतीश कोळपे यांची निवड करण्यात आली आहे. प्रविण चोरडिया यांच्या राजीनाम्यानंतर उपसभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे तालुक्यांतील जनतेमध्ये उत्सुकता होती. शिरूर बाजार समिती ही तालुक्यातील अग्रणी व महत्वाची संस्था आहे. तळेगाव ढमढेरे, पिंपळे जगताप, पाबळ, जांबुत, वडगांव रासाई येथे बाजार समितीचे उपबाजार असुन, शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी जवळची बाजारपेठ उपलब्ध आहे. या निवडणुकीत शिरूर हवेलीचे आमदार, ॲड. अशोक पवार व माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. सध्या सभापती म्हणुन न्हावरे येथील जेष्ठ नेते ॲड. काकासाहेब कोरेकर असुन, या सर्वांच्या अनुमताने प्रा सतिष कोळपे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी शिरूर – हवेलीचे आमदार ॲड. अशोकबापू पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, शिरूर तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष रवीबापू काळे, शिरूर आंबेगाव राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील, बाजार समितीचे सभापती ॲड. काकासाहेब कोरेकर, माजी सभापती शशिकांत दसगुडे, माजी सभापती शंकर जांभळकर, माजी उपसभापती विश्वासकाका ढमढेरे, विकासआबा शिवले, प्रविणशेठ चोरडीया, संचालक आबाराजे मांढरे, विजेंद्र गद्रे, ॲड. सुदीप गुंदेचा, बंडु जाधव, छायाताई बेनके, मंदाकिनी पवार, सचिव अनिल ढोकले यांच्यासह तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन, शिरूरचे सहाय्यक निबंधक शंकर कुंभार यांनी व त्यांना सहाय्यक म्हणुन जी डी पुंड यांनी कामकाज पाहीले. प्रा सतिष कोळपे हे सोसायटी मतदार संघातुन निवडुन आले असुन, यापूर्वी त्यांनी गुणाट सेवा संस्थेचे अध्यक्ष म्हणुन काम पाहीलेले आहे. तसेच यापुर्वी त्यांचे बंधु बाजीराव कोळपे, हे १९९७ मध्ये शिरूर पंचायत समितीचे सभापती होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निष्ठावंत म्हणुन कोळपे बंधूंची तालुक्यात ओळख आहे.
बाजार समिती मध्ये गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अशोक पवार व माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या मार्गदशनाखाली शेतकऱ्यांचे शेतमालाला चांगला बाजारभाव, तसेच शेतमाल विक्रीसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे, प्रा कोळपे यांनी यावेळी सांगितले. बाजार समितीच्या सभापतीपदी पेशाने वकील असलेले काकासाहेब कोरेकर, तर शिक्षक असलेले कोळपे यांच्या निवडीने पक्ष श्रेष्ठींनी अभ्यासु कार्यकर्त्यांना संधी दिल्याने तालुक्यात आनंद व्यक्त होत आहे.