कु.वैभवी पारखे, कु.पुर्वा खुडे व विविध क्षेत्रातील मान्यवरांना पत्रकार संरक्षण समिती इंदापूरच्या वतीने पुरस्कार प्रदान

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे

दि. २८/०१/२०२३


 

मराठीतील पहिले बातमीपत्रक म्हणून ओळखले जाणारे दर्पण चे संपादक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त ६ जानेवारी रोजी सर्वत्र मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर पत्रकार संरक्षण समिती इंदापूर च्या वतीने रविवार दि. २२/०१/२०२३ रोजी, इंदापूर तालुक्यातील निरा नरसिंहपुर येथे विविध क्षेत्रातील गुणवंतांचा महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री व इंदापूर चे विद्यमान आमदार दत्ता मामा भरणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, ग्रामसेवक, आरोग्यसेवक आदी क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह भ प गुरुवर्य बापू महाराज देहुकर होते. तर प्रमुख उपस्थितांमध्ये ज्येष्ठ पत्रकार नाथाभाऊ ऊंद्रे पा., संजय गांधी निराधार याजनेचे इंदापूर तालुकाध्यक्ष सागरबाबा मिसाळ, गाडगे महाराज मराठा धर्मशाळा ट्रस्ट पंढरपूरचे विश्वस्त राधेश बादले पा., श्रीमंत ढोले, हनुमंत कोकाटे, हरिभाऊ घोगरे, नवनाथ रूपनवर, चंद्रकांत सरवदे, आनंद काकडे, पांडुरंग डीसले, दादासाहेब क्षीरसागर, सरपंच शीतल मोहिते, विजय सरवदे, शरद बोडके, हरिभाऊ सुतार, भीमराव मोरे, संदीप मोहिते, डॉ कुमार लोंढे, गणेश भोसले, कल्याण बंडलकर आदी मान्यवर होते.

पत्रकार संरक्षण समितीचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष व आपला आवाज केबल टिव्ही चॅनेल चे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांची कन्या व रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल शिरूर (मलठण) ची विद्यार्थिनी कु. पुर्वा खुडे, तसेच शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्याधाम प्रशालेतील विद्यार्थिनी कु. वैभवी संजय पारखे, यांना ई ८ वी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा मेरिटमध्ये आल्याबद्दल गुणवंत विद्यार्थिनी म्हणून माजी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार भरणे म्हणाले की, “पत्रकार बांधवांनी जे सत्य आहे तेच लिहिले पाहिजे, मग तो जवळचा असो की लांबचा असो. नेहमी सत्याची कास धरून वस्तुस्थिती मांडण्याचे काम पत्रकारांनी करावे, तरच लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हा खऱ्या अर्थाने भक्कम होईल. आपल्या लिखाणातून सर्वसामान्यांच्या व्यथा व वस्तुस्थिती मांडून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे.”

 


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून बोलताना गुरुवर्य बापू महाराज देहुकर यांनीही सर्व पत्रकार बांधवांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या सर्वांच्या हातून समाजाची सेवा घडण्यासाठी आशीर्वाद देत, पुरस्कार सोहळ्याच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ उन्द्रे पा., जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. रवींद्र पं. खुडे, जिल्हा कायदेशीर सल्लागार ॲड संतोष शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष जगदीश उंद्रे पा., जिल्हा वैद्यकीय सल्लागार डॉ मोहन वाघ, खेड तालुकाध्यक्ष दिनेश कुऱ्हाडे, हवेली तालुकाध्यक्ष अशोक आव्हाळे, बारामतीचे अमोल यादव, तेजस चीमरे, पोलीस मित्र संघटनेचे प्रा वाळेकर, इंदापूर तालुकाध्यक्ष बाळासाहेब सुतार, तालुका कार्याध्यक्ष डॉ सिद्धार्थ सरवदे, तालुका उपाध्यक्ष धनाजी शेडगे, सचिव सतीश जगताप, यांसह समाधान रजपूत, संदीप क्षीरसागर, मल्हारी लोखंडे, सौरभ सुतार, अमोल चिकने, सलीम शेख, पुणे जिल्हा न्यायालयाचे निवृत्त हेड बेलीफ पंढरीनाथ खुडे, रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षिका भारती खुडे (चांदणे), तसेच पुणे व सोलापूर जिल्ह्यातून अनेक पत्रकार बांधव व विविध क्षेत्रातील मान्यवर, आजी माजी पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश कोकाटे यांनी केले, तर आभार डॉ सिद्धार्थ सरवदे यांनी मानले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *