पिंपरी-चिंचवडमधील महावितरणच्या समस्यांबाबत ऊर्जामंत्र्यांना साकडे !- भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांचे निवेदन

– भोसरी विधानसभा मतदार संघात महावितरण केंद्र वाढवा

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि ७ जुलै २०२१
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध वीज समस्या, लघु उद्योजकांना येणाऱ्या अडचणी आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील समाविष्ट गावांमध्ये विजवाहिन्या भूमिगत करुन आवश्यकतेनुसार सब स्टेशन, व शाखा कार्यालय वाढवण्याबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी सांकडे घातले आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोठ्या प्रमाणात असणाऱ्या औद्योगिक परिसरामुळे पिंपरी- चिंचवड शहराची ‘उद्योगनगरी’ अशी ओळख आहे. तसेच, सामान्य नागरिक, बाहेर राज्यातून आलेले कामगार आणि चाकरमान्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शिक्षण घरातूनच सुरू आहे. दरम्यान, शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अनियमित आणि सतत खंडीत होणारा वीजपुरवठा, वाढीव बिले, महावितरणाकडून संथ गतीने सुरू असणारी कामे व त्यामुळे येणाऱ्या अडचणी आशा अनेक समस्या भेडसावत आहेत. यासोबतच महावितरणाकडून निर्माण झालेल्या अनेक समस्यांमुळे लघुउद्योजक मेटाकुटीला आले आहेत. याबाबत तात्काळ ठोस निर्णय घेणे अपेक्षीत आहे.
*
वीज समस्यांमुळे उद्योजक अडचणीत…
उद्योजक कंपन्यांच्या महावितरण प्रशासनासोबत विविध समस्यांवर बैठका व वारंवार पत्रव्यवहार झालेला आहे. परंतु, वर्षानुवर्षे वीज समस्यांमुळे उद्योजक त्रासले आहेत, याचा विपरीत परिणाम उत्पादनावर होत आहे. त्यामध्ये देखभाल दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण होत नाहीत. रस्ता रुंदीकरण आणि डांबरीकरणामुळे जमिनीत गाडले गेलेले फिडर पिलर महावितरणकडून तातडीने बदलून मिळत नाहीत, केबल दोष शोधणारी वाहने वेळेत कधीच उपलब्ध होत नाहीत या प्रमुख समस्यांचा समावेश आहे. तसेच, थ्री फेज मीटर उपलब्ध नसल्यामुळे उद्योगांना अंदाजे वीज बिलांचे वाटप केले जाते. त्याचा भुर्दंड अनेकदा सोसावा लागतो. मंदीच्या काळात आर्थिक ओझे सोसणे अनेक उद्योजकांना कठीण जात आहे.

Advertise


*
कामगार, विद्यार्थी यांना नाहक मनस्ताप…
दुसरीकडे, तासनतास होणाऱ्या भारनियमनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात व्यत्यय येत आहे. शिवाय अनेक रुग्णालयातील वीजपुरवठाही खंडित होत असल्याने रुग्णांनादेखील अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कुठलीही अनुचित घटना घडू नये. यासाठी वीज वितरण विभागाने लक्ष देणे महत्वाचे आहे. दिवसभरात सरासरी तीन तास वीज पुरवठा खंडीत केला जातो. त्याचा परिणाम ‘वर्क फ्रॉम होम’ मधील कामगारांवर होत आहे. काम पूर्ण होत नसल्यामुळे कामगारांच्या नोकरीवर गदा येण्याची वेळ आली आहे. वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शिक्षण, समाविष्ट गावांतील विकासामुळे वाढलेली वीजेची मागणी आणि महाविरण कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या यामुळे पूर्वी असलेल्या यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत आहे. त्यामुळे भोसरी मतदार सघांत आवश्यकतेनुसार एक सबस्टेशन आणि शाखा वाढवणे गरजेचे आहे. याबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *