एका सदनिकाधारकाने कर थकविल्यास पूर्ण सोसायटीचा पाणीपुरवठा बंद करण्याचा जुलमी निर्णय मागे घ्या; हौसिंग फेडरेशनची मागणी

दि. १४/०१/२०२३
पिंपरी

पिंपरी : मालमत्ताकर न भरल्यास पाणीपुरवठा तोडण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होताच. दोन दिवसांपूर्वी आयुक्तांनी पत्रकार परिषदेत या निर्णयाचे समर्थन केले होते. त्यामुळे कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांचा पाणीपुरवठा पालिका बंद करणार हे अधोरेखित झाले आहे. मात्र, सोसायटीतील काही सदस्यांनी कर भरला नसल्यास पूर्ण सोसायटीचा पाणीपुरवठा बंद केला जात आहे. ही बाब करदात्या नागरिकांवर अन्याय करणारी असल्याने याला हौसिंग सोसायटी फेडरेशनने आक्षेप घेतला आहे.

फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी पालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पालिकेच्या करसंकलन विभागाकडून सध्या थकीत कर वसुलीसाठी मोहीम चालू आहे.या मोहिमेअंतर्गत आपल्या करसंकलन विभागामार्फत पिंपरी चिंचवड शहरातील सहकारी गृहनिर्माण संस्थेमधील काही सदस्यांनी मालमत्ताकर थकविल्याने पूर्ण सोसायटीचा पाणीपुरवठा तोडला जात आहे. ही अतिशय चुकीची व बेकायदेशीर बाब आहे. सोसायट्यांमधील काही सदस्यांनी मालमत्ताकर भरला नसल्यामुळे पूर्ण सोसायटीचा पाणीपूरवठा कट करणे म्हणजे सोसायट्यांमधील ज्या नागरिकांनी नियमाने मालमत्ताकर भरला आहे त्यांच्यावर अन्याय आहे. अशा प्रकारची चुकीची व जुलमी मोहीम कृपया राबवू नये ही विनंती.

अन्यथा पिंपरी चिंचवड शहरातील कोणत्याही सहकारी गृहनिर्माण संस्थेकडून आपल्या करसंकलन विभागास आणि पिंपरी चिंचवड मनपास सहकार्य केले जाणार नाही. तसेच जर ही चुकीची व अन्यायकारक मोहीम आपण चालूच ठेवली, तर ज्या सोसायटीधारकांनी पूर्ण मालमत्ताकर भरलेला आहे त्यांना सोबत घेऊन आपल्या पिंपरी चिंचवड मनपासमोर खूप मोठे आंदोलन केले जाईल. सहकारी गृहनिर्माण संस्थेतील ज्या सदस्यांनी मालमत्ता कर भरला नसेल त्यांच्या मालमत्ता जप्त करा किंवा इतर कायदेशीर कारवाई करा यासाठी आपले फेडरेशन पिंपरी चिंचवड मनपास सहकार्य करेल, परंतु चुकीच्या मार्गाने सर्व सोसायटीचा पाणीपुरवठा बंद केला तर याला आमचा प्रखर विरोध राहील याची कृपया नोंद घ्यावी.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *