उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत “शिवसंस्कार सृष्टीचे” प्रकल्पाचे सादरीकरण

रोहित खर्गे, पुणे विभागीय संपादक

पुणे – खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून आणि आमदार अतुल बेनके यांच्या सहकार्याने जुन्नरमध्ये उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी “शिवसंस्कार सृष्टी” प्रकल्पाचे सादरीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात जुन्नरमध्ये “शिवसंस्कार सृष्टी” उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचा मनोदय डॉ. कोल्हे यांनी वेळोवेळी व्यक्त केला होता. त्यानुसार राजमाता जिजाऊंनी शिवरायांवर बालपणी केलेले संस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या इतिहासाने महाराष्ट्रावर केलेले संस्कार या संकल्पनेवर आधारित असणाऱ्या व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात येणाऱ्या “शिवसंस्कार सृष्टी”चे सादरीकरण डॉ. कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले होते. यामध्ये बारा बलुतेदारांपासून ते नव्या पिढीला शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य, संत परंपरा अशा विविध दालनांचा समावेश असणार आहे.

जुन्नरमध्ये सहा एकर जागेवर “शिवसंस्कार सृष्टी” प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. कोल्हे यांच्या संकल्पनेतून आणि आमदार अतुल बेनके यांच्या सहकार्याने उभारण्यात येणारा हा प्रकल्प पर्यटकांचे आकर्षण ठरु शकेल. तसेच त्यामुळे स्थानिक पातळीवर व्यवसायाला चालना मिळून रोजगार निर्माण होऊ शकतील.

या सादरीकरण प्रसंगी पर्यटन सचिव श्री. खामकर, सुप्रसिद्ध व ज्येष्ठ वास्तुरचना तज्ज्ञ श्री. संदीप शिखरे, श्री. प्रेषित जोशी, नितीन कुलकर्णी, अमोल हरपळे आदी उपस्थित होते.