MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०५ नोव्हेंबर २०२२


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २९ ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (पूर्व) परीक्षा २०२२ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर ४ नोव्हेंबर २०२२ रोजी जाहीर करण्यात आला आहे. पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरता प्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी व गुणांची कटऑफ आयोगाच्या या https://mpsc.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

एमपीएससीने आपल्या निवेदनात म्हटले की, पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांचा निकाल जाहीर झाला आहे. पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या व परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल, असे एमपीएससीनं आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.मुख्य परीक्षा २१, २२ व २३ जानेवारी २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. पूर्व परीक्षेतील पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे कळविण्यात आले आहे. मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पध्दतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क विहित मुदतीत विहित पध्दतीनं सादर करणं आवश्यक आहे. अन्यथा त्या उमेदवाराला मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच, पूर्व परीक्षेसाठी केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरिता ग्राह्य ठरतील.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *