खंडणीसाठी अपहरण केलेल्या मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांची सुटका; तीन अपहरणकर्ते अटकेत

दि. १४/०१/२०२३

पुणे

 

पुणे : मुंबईतील तीन बांधकाम व्यावसायिकांचे पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातून अपहरण करण्यात आले होते. पुणे पोलिसांनी झपाट्याने हालचाली करत अवघ्या काही तासात श्रीगोंदा, जि.अहमदनगर येथून त्यांची सुटका करण्यात यश मिळविले आहे.

या प्रकरणी अहमदनगर येथील तीन अपहरणकर्त्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली फॉर्च्यूनर आणि क्रेटा कार जप्त केली आहे.प्रवीण शिखरे, विजय खराडे, विशाल मदने (रा. अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी श्रीगोंदा येथील एका लॉजमधून आरोपींना अटक करुन तीन बाधंकाम व्यावसायिकांची सुखरुप सुटका केली. अपहरण झालेल्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या भावाने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील तीन बांधकाम व्यावसायिक हे पुण्यात कामानिमित्त आले होते. यावेळी आरोपींनी पन्नास लाखांच्या खंडणीसाठी पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातून त्यांचे अपहरण केले. यानंतर आरोपींनी एका व्यक्तीच्या मोबाईलवरुन त्यांच्या भावाशी संपर्क साधला. तिघांना सोडवायचे असेल तर ५० लाख रुपये द्या असे आरोपींनी सांगितले. तसेच व्हॉट्सअॅपद्वारे व्हिडिओ कॉल करुन मारहाण करीत असल्याचे फिर्यादी यांनी सांगितले. गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची पाच पथके तयार करण्यात आली.

आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची पाच पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी तांत्रिक तपास करून आरोपींचा शोध घेतला असता ते श्रीगोंदा येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीने सापळा रचून एका लॉजमधून तिघांना ताब्यात घेतले. यावेळी आरोपीचे पाच ते सहा साथीदार पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 गजानन टोणपे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सुनील पंधरक, अजय वाघमारे सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, विशाल मोहिते, कृष्णा बाबर, पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव, अविनाश लोहोटे व गुन्हे शाखेच्या पथकातील अंमलदार यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *