नावाजलेले पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन संतोष एलभर यांचे कोरोनाने निधन, वडीलही व्हेंटिलेटरवर…

रवींद्र खुडे, विभागीय संपादक, शिरूर

शिरूर तालुक्यातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेले, पै. संतोष गेनभाऊ एलभर (वय वर्ष ४९) यांचे आज रविवार दि. २ मे २०२१ रोजी, शिरूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना, दुपारी २ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पछ्यात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन विवाहित बहिणी, चुलते व चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे.

पै. संतोष यांनी १९९७ साली महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी मिळविली होती.
त्यांचे वडील पै. गेनभाऊ येलभर, मुलगा पै. आदिनाथ, चुलत बंधू पै. सचिन व मोटेवाडीचे माजी सरपंच पै. संदीप, अशी मोठी पैलवनांची फौज एकाच कुटुंबात असून, त्यांनी कुस्ती क्षेत्रात दैदिप्यमान अशी कामगिरी केलेली आहे.

त्यांचे मूळ गाव शिरूर जवळील मोटेवाडी असून, ते अनेक वर्षांपासून शिरूर येथील करंजुले नगर येथे रहात होते. काही दिवस त्यांनी येथे किराणा मालाचे दुकान चालविले. त्यानंतर रांजणगाव MIDC मध्ये त्यांना ठेकेदारीची कामे मिळाली होती.

करंजुले नगर येथिल अनेक प्रश्नांच्या निराकारणात व येथील महत्वाच्या जडण घडणींमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे, येथील रहिवासी व त्यांचे मित्र ज्ञानदेव करंजुले सर यांनी आपला आवाज न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले.

त्यांचे वडील गेनभाऊ एलभर हे देखील जुन्या पिढीतील एक नावाजलेले पैलवान व माजी सैनिक होते. आपल्या वडिलांकडून कुस्तीचे धडे घेत, पै. संतोष एलभर यांनी महाराष्ट्र चॅम्पियन पर्यंत मजल मारलेली होती.
तर त्यांचे चुलत बंधू पै. सचिन दौलत एलभर यांनी देखील, पै. संतोष यांच्या पावलावर पाऊल ठेवत, उपमहाराष्ट्र केसरी पर्यंत मजल मारलेली आहे.
शीरुर येथील जैन मंदिराजवळच्या तालमीत त्यांच्यासह अनेक नावाजलेले पैलवान घडले. या तालमीत पै. संतोष एलभर यांनी आपल्या मुलालाही कुस्तीचे प्रशिक्षण दिले. या तालमीचे नूतनीकरण करण्यात त्यांचा खूप मोठा वाटा होता. तालमीत नव्यानेच मॅट व इतरही गोष्टींची पूर्तता करण्यात आली होती. पूर्वीच्या मातीतील कुस्त्यांची जागा आता मॅट च्या कुस्त्यांनी घेतल्याने, येथेही नवीन पिढीसाठी आधुनिकीकरण केलेले होते.
त्या तालमीत पै. संतोष यांचा मुलगा कु. आदिनाथ देखील तालीम घेत आहे. त्यानेही जिल्हा उप केसरी पर्यंत, १७ वर्ष वयोगटात विजेतेपद मिळविलेले आहे.
एलभर यांची ही तिसरी पिढी पैलवानकी करत असून, त्यांच्या व इतर काही नावाजलेले पैलवान तसेच कुस्तीप्रेमींमुळे, शिरुरला कुस्तीमध्ये चांगले दिवस आलेले आहेत.

पै. संतोष यांचे वडील गेनभाऊ एलभर हे देखील आजारी असून, पुण्यातील K E M हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असून, तेही व्हेंटिलेटर वर आहेत. गेनभाऊ एलभर हे जुन्या पिढीतील नावाजलेले पैलवान असून, शिरूर येथील रहिवासी व एक नावाजलेले पैलवान, महाराष्ट्र केसरी रघुनाथदादा पवार यांच्या पिढीतील व त्यांच्या सोबत कुस्त्यांचे धडे घेणारे व दोघेही चांगले मित्र म्हणून, शिरूरकरांना परिचित आहेत.

 कोरोना सारख्या साथीच्या रोगाने, अशा नावाजलेल्या पैलवानावर घाला घालत त्यांचा जीव घेतला. परंतु त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये केलेल्या चांगल्या कामांमुळे व मिळविलेल्या यशामुळेच ते सर्वांच्या स्मरणात राहीले आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच, सोशल मीडियावर अनेक मान्यवरांनी व त्यांच्या मोठ्या मित्रपरिवाराने, त्यांना श्रद्धांजली वाहत आपल्या मित्राबद्दलच्या अनेक आठवणींना उजाळा दिलेला आहे.

अशा एका नावाजलेल्या पैलवानाच्या जाण्याने, कुस्ती क्षेत्राची खूप मोठी हानी झालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *