पवार आमचे मार्गदर्शक, पण खेडमध्ये वळवळणाऱ्या किड्यांचा बंदोबस्त करु’, संजय राऊतांचा घणाघात

अक्षता कान्हूरकर

 

राजगुरूनगर : खेड पंचायत समिती सभापती निवडणुकीवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा जोरदार राजकारण रंगताना पहायला मिळत आहे. शिवसेनेचं बहुमत असूनही खेड पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत आज खेड दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार दिलीप मोहिते यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. मात्र खेडमध्ये जे किडे वळवळ करत आहेत त्यांचा बंदोबस्त आम्ही करु, असा इशाराच संजय राऊत यांनी दिलाय.

पक्षात थोडी शिस्त आणली की दिलीप मोहीते घरी बसतील. आपण भल्याभल्यांना अंगावर घेतलं आहे, अशा शब्तात राऊत यांनी पुन्हा एकदा खेडमधून राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचलं आहे. सत्ता हा आमचा आत्मा किंवा प्राण नाही. खेडमध्ये जे राजकारण झालं ते गलिच्छ आहे. विद्यमान आमदारांना थोडी जरी माणुसकी असती तर असं घाणेरडं राजकारण केलं नसतं. आघाडी सरकारमध्ये विषय बसून सोडवले जातात. मात्र हे आमदार महाशय… जे काही घडलं त्याची नोंद ठेवली आहे. आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही. आज पोलीस आमचे कार्यकर्ते उचलत आहेत, उद्या आम्ही त्यांना उचलू. राजकारणात आमचा पिढीजात धंदा तो आहे. राजकीय कार्य़कर्त्यांनी सूड उगवायचं सोडायचं नसतं, असा इशाराच संजय राऊत यांनी यावेळी दिलाय.

भाजपनं युतीत गद्दारी केली. त्यामुळं आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेलो. तुम्ही आमचे उमेदवार पाडत राहिलात, आम्ही तुमचं सरकार पाडलं, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवरही निशाणा साधलाय. खेडमध्ये पुढचा आमदार हा शिवसेनेचाच असेल, असा थेट इशारा राऊतांनी दिलीप मोहिते यांना दिलाय. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन राऊतांनी केलं. मास्न न लावलेलं उद्धवजींनी पाहिलं तर आपली चंपी करतील, आधी माझी आणि नंतर तुमची भाजपला कोरोना झाला म्हणून सत्तेवरुन गेली.

पाप केलं की कोरोना होतो. भाजपनं शब्द फिरवण्याचं पाप केलं, अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केलीय. बाबरी पाडताना मंदिर वही बनायेंगे असं म्हणणारे पळून गेले होते. त्यांना विचारलं तर म्हणाले वो शिवसैनिक हो सकते है. तेव्हा बाळासाहेबांनी स्टेटमेंट दिलं की जर शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर मला त्याला अभिमान आहे. ही शिवसेना त्यांना श्वास आहे. गर्दी दिसली की बाळासाहेब ताजेतवाने व्हायचे. बाळासाहेबांचं निधन झालं तेव्हा 40 लाख लोक जमले.

जगानं त्याची दखल घेतली. अशा महान नेत्याचे आपण पाईक आहोत. तुम्ही आमच्याशी गद्दारीची भाषा करता. बाळासाहेब नसते तर मुंबई विकली गेली असती. शिवसैनिकांच्या वाट्याला जाऊ नका. ही दुसरी वेळ आहे, असा इशारा राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिलाय.

आमचे शिवसैनिक आतमध्ये सडवले जात असतील तर ती वेदनाही मुख्यमंत्र्यांच्या मनात आहे. समोर कोण आहेत याची पर्वा करु नका. आपण शिवसैनिक आहोत हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रात आघाडीचा धर्म आपण पाळला पाहिजे. तिघांचा शत्रू एकच आहे. आमचे मार्गदर्शक शरद पवार आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. मात्र, खाली खेडमध्ये जे किचे वळवळ करत आहेत त्यांचा आम्ही बंदोबस्त करु, असंही संजय राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *