सीमा पोटे नारायणगावकर यांच्यासह दिग्गजांना राज्यस्तरीय विशेष सन्मान पुरस्कार

महालावणी महोत्सवात लिला गांधी, माया जाधव, संजीवनी नगरकर यांचाही सन्मान

 

सांस्कृतीक क्षेत्रात म्हणजेच सिने, नाट्य, तमाशा व लावणी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिग्गजांना पिंपरी चिंचवड येथे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या हस्ते रविवार दिनांक २६ रोजी सन्मानित करण्यात आले.
लोकनाट्य तमाशा व लावणी क्षेत्रात आजपर्यंत उल्लेखनीय कामगिरी करणारी सर्वोत्कृष्ट कलाकार सीमा सुधाकर पोटे नारायणगावकर यांच्यासह ज्येष्ठ दिग्गज सिने कलाकार लिला गांधी, माया जाधव, संजीवनी नगरकर व ज्येष्ठ नृत्य कलाकार श्री कपोते यांचा शाल, वस्त्र, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या फोरम पार्टनर असलेल्या आपला आवाज आपली सखी व्यासपीठाच्या संचालिका संगीता तरडे, संतोष साखरे यांचा देखील सांस्कृतिक मंत्र्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी राज्यस्तरीय महालावणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी विरोधी पक्ष नेत्या सुलभाताई उबाळे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २६ मार्च २०२३ रोजी पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगुंटीवार, खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते व माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लावणी स्पर्धेचा बक्षीस समारंभ करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आमदार व शिवसेना उपनेते सचिन अहिर, आमदार अश्विनी जगताप, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, सचिन भोसले तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी माजी नगरसेवक व हजारो महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
लावणी स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे एक लाख रुपयांचे पारितोषिक महेंद्र बनसोडे निर्मित कैरी पाडाची या लावणी ग्रुपने मिळविला. द्वितीय क्रमांक विजय उलपे निर्मित मी राजसा तुमच्यासाठी यांनी मिळवला. तृतीय क्रमांक अजिंक्य झांबरे निर्मित जल्लोष अप्सरांचा यांनी मिळवला.
उत्कृष्ट नृत्यांगना म्हणून सोनाली जळगावकर यांना प्रथम पारितोषिक देण्यात आले.
स्पर्धेच्या परीक्षक म्हणून ज्येष्ठ लावणी नृत्यांगना सुरेखा पुणेकर व मेघा घाडगे या होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका व डबिंग आर्टिस्ट मेघना एरंडे व प्रमिला चव्हाण यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *