पर्यटन संचालनालयातर्फे चित्रकला व छायाचित्रण स्पर्धा

दि. १३/०१/२०२३
पिंपरी

 

पुणे  : पर्यटन संचालनालय आणि भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये पर्यटन विषयक जागृती निर्माण करण्यासाठी चित्रकला स्पर्धा व खुल्या गटासाठी छायाचित्रण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

चित्रकला स्पर्धा ही इयत्ता ७ वी १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ किंवा पर्यटन वास्तू यावर चित्र काढायचे आहे. चित्र रेखाटताना त्याचा आकार -३७ सेमी x २७ सेमी एवढा असावा. चित्र जलरंग, पेस्टल्स किंवा रंगीत पेन्सिल माध्यमात रंगवलेले असावे. चित्राच्या मागील उजव्या कोपऱ्यात स्वत:चे संपूर्ण नाव, शाळेचे नाव, जन्म दिनांक, पूर्ण वय तसेच आपला मोबाइल क्रमांक आदी माहिती चौकटीत लिहावी. चित्राखाली पालकांची स्वाक्षरी असावी.

छायाचित्रण स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे अथवा पर्यटन वास्तू यांचेच छायाचित्र स्पर्धेसाठी पाठवावे. छायाचित्रे ए-४ आकाराच्या फोटो प्रिंट कागदावर द्यावेत. छायाचित्र व चित्रकला स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी काढलेली चित्रे व छायाचित्रे शुक्रवार २० जानेवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत  भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेच्या हॉटेल सेंट्रल पार्क येथील आयोजित पर्यटन प्रदर्शनातील  बूथमध्ये जमा करावीत. उशीरा येणारी चित्रे स्पर्धेकरीता ग्राह्य धरली जाणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी.

दोन्ही स्पर्धांसाठी प्रवेश शुल्क नाही. स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व पर्यटन व्यावसायिकांकडून आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी चित्रकला स्पर्धेकरीता ऋषिकेश फुटाणे यांचेशी (९४२२३१८४४०) व छायाचित्र स्पर्धेकरीता चंदन पठारे (९७६५३०४०३४) यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर- दातार व भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रविण घोरपडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *