मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरलेल्या अधिकारी, ठेकेदारावर कारवाई करा; मारुती भापकर यांची मागणी

दि. ११/०१/२०२३
पिंपरी


पिंपरी : पिंपरीतील संत तुकारामनगर येथील एका बालकावर नुकताच भटक्या कुत्र्याने हल्ला केला होता. या प्रकरणी जबाबदार असणारे अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कठोर फौजदारी कारवाई करून शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त होण्यासाठी रात्रीच्या वेळी श्वानपथक कार्यान्वित करावे अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे.

भापकर यांनी आयुक्त शेखर सिंह यांना पत्र दिले आहे त्यात म्हटले आहे की, मोहननगर, चिंचवड स्टेशन आकुर्डी आदी परिसरात मोकाट कुत्र्यांचा प्रचंड उपद्रव होत आहे. विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक, कामगार यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आपण यावर योग्य त्या उपाययोजना राबव्यात. या गंभीर प्रकरणात आपण स्वतःहा तातडीने लक्ष घालून या समस्येचे निराकरण करावे. जर एखादा मोठा अपघात होऊन एखाद्या नागरिकाला प्राणास मुकावे लागले तर याची सर्वस्व जबाबदारी आपली असेल असे मी या आधी माझ्या पत्रात म्हटले होते.मात्र आपण व आपल्या प्रशासनाने याबाबत केवळ कागदी घोडे नाचवणे पलीकडे काही केले नाही.

महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत निविदा काढून मोकाट कुत्रे पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याचा ठेका महापालिकेने ठेकेदाराला दिला आहे. यासाठी महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र या मोकाट कुत्र्यांची संख्या घटण्या ऐवजी ती वाढतानाच दिसते. तसेच मनपा व खाजगी रुग्णालयात श्वानदंश झालेले पीडित व्यक्ती रंबीज इंजेक्शन घेतात याची आपण माहिती घेतली तर आपल्याला या विषयाचे गांभीर्य लक्षात येईल. संत तुकाराम नगर येथील मोहम्मद शेख वय ६ वर्षे या चिमुरड्या विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला झाला. त्याच्या डाव्या हाताला तीन ठिकाणी भटक्या कुत्र्याने काडाडुन चावा घेतला. या कुत्र्याचा चावा इतका भयंकर होता की या मुलाच्या हाताचे अक्षरशः लचके तोडले गेले. सुदैवाने काही नागरिकांनी या कुत्र्याला हुसकावून लावले म्हणून मोहम्मदचा जीव वाचला. मोहम्मदला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या हाताला १३ टाके पडले आहेत. हा प्रकार आपल्या किंवा आपल्या प्रशासन अधिकाऱ्याच्या किंवा संबंधित ठेकेदाराच्या मुलाबाबत घडला असता तर आपली काय मनस्थिती असती याचे आत्मचिंतन आपण व आपल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ठेकेदारानी करावे.

कोविड काळातील मोकाट कुत्र्यांचे निर्बिजिकरण व त्यातील गैरकारभार याबाबत मनपा प्रशासनाने चौकशी नेमली होती. या चौकशीचा अहवाल तत्काळ जाहीर करावा. मोकाट कुत्री रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात त्यामुळे रात्रीच्या वेळी देखील श्वानपथक कार्यान्वित करावे. पशुवैद्यकीय विभागाच्या गलथान व भ्रष्ट कारभारामुळेच हे सर्व जीवघेणे प्रकार होत आहे. अधिकारी ए‌‌.सी.मध्ये बसून कागदी घोडे नाचवणे यापलीकडे काम करत नाहीत‌. निविदा काढायच्या, बिले काढायची, त्यातून टक्केवारी कमवायची हेच काम सध्या महापालिकेमध्ये जोरात सुरू आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकारी व ठेकेदारावर कठोर फौजदारी कारवाई करावी.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *