विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले जगताप कुटुंबियांचे सांत्वन

दि. ०५/०१/२०२३
पिंपरी


पिंपरी : राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

आमदार जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील निवासस्थानी अजित पवार आणि एकनाथ खडसे यांनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. जगताप कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांची भेट घेतली. त्यावेळी माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक अतुल शितोळे, बाबुराव चांदेरे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नगरसेवक, महापौर ते विधिमंडळातील तडफदार प्रतिनिधी म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवणारे नेतृत्व काळाने हिरावून नेले आहे. जनतेच्या प्रश्नासाठी तळमळीनं काम करणारा झुंजार लोकप्रतिनिधी, जवळचा सहकारी गमावला आहे. राजकीय, सामाजिक जीवनात त्यांनी केलेलं काम कायम शहरवासियांच्या स्मरणात राहील. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात त्यांनी मोलाचे योगदान दिले अशा भावना अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *