स्त्री देहाचे विकृत प्रदर्शन रोखण्यासाठी पक्षभेद विसरून एकत्र या : चित्रा वाघ

दि. ०३/०१/२०२३
मुंबई


मुंबई : समाजस्वास्थ्यासाठी स्त्री देहाचे विकृत प्रदर्शन करणे अयोग्य असल्यानेच उर्फी जावेद हिने सार्वजनिक ठिकाणी केलेल्या अंगप्रदर्शनाला विरोध करणे जरुरीचे आहे. अशा अंग प्रदर्शनातून आपण लेकी- बाळींपुढे कोणता आदर्श ठेवणार आहोत याचा विचार पक्षभेद विसरून सर्वांनी करावा. या विषयाचे राजकारण न करता सामाजिक स्वास्थ्य जपण्यासाठी सावित्रीमाईंचे संस्कार आणि छत्रपती शिवरायांचा आदर्श जपण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले आहे.

श्रीमती वाघ यांनी या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की उर्फी जावेद हिने कोणता पेहराव करावा काय बोलावे याला माझा मुळीच आक्षेप नाही. माझा विरोध सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीने अंगप्रदर्शन करण्याला आहे. आपण ज्या समाजात वावरतो तेथे अशा पद्धतीने शरीराचे हिडीस प्रदर्शन करणे योग्य आहे का? आपल्या घरातल्या लेकीबाळींपुढे अशा विकृतीचा आदर्श ठेवायचा का ? याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. हा विषय राजकारणापलीकडचा आहे हे उर्फीचे समर्थन करणाऱ्यांनी लक्षात घेऊन माझ्या भूमिकेवर टीका करावी.

सार्वजनिक ठिकाणी भर वस्ती आणि रस्त्यावर खुल्या वातावरणात आपला पेहराव व्यवस्थित राखणं हे सामाजिक भान आहे. पेहरावाचे भान सवंग प्रसिद्धीसाठी राखले जात नसेल तर त्याला नंगट मानसिकताच म्हटले पाहिजे. महिला सक्षमीकरणाचा जागर करताना स्त्रीचा उपभोग्य वस्तू म्हणून बाजार मांडला जाऊ नये. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली असा स्वैराचार खपवून घेतला जाणार नाही असेही श्रीमती वाघ यांनी या पत्रकात नमूद केले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *