बाळासाहेबांच्या पायाला हात लावायचाही अधिकार तुम्हाला राहिला नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

२९ डिसेंबर २०२२


महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर विधीमंडळाने केलेल्या ठरावावर विधानपरिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर निवेदन केले. यावेळी कर्नाटक सरकारला खडेबोल सुनावत असतानाच शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोमणे लगावले. एकनाथ शिंदे यांच्या टोलेबाजीनंतर  ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी करताना शिंदे यांच्या टोमण्यांवर उत्तर दिले आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, कर्नाटक सीमावाद आंदोलनात मी तुरुंगात गेलो होतो. तरिही माझ्या आंदोलनावर काही लोक संशय घेण्याचे काम करत आहेत. ते म्हणतात (उद्धव ठाकरे), तेव्हा मी त्यांच्याकडे होतो. पण मी सांगू इच्छितो की, मी तेव्हाही शिवसेनेत होतो आणि आजही बाळासाहेबांच्या शिवसेनेत आहे. आजही माझ्या डोक्यात मुख्यमंत्रीपद गेलेले नाही. मी शिवसैनिकच आहे. काही घराबाहेर न पडणारे लोक आज रस्त्यावर आलेत, रस्त्यावरुन पायरीवर आलेत. याच्यातच आमचा विजय आहे. आम्ही आनंद दिघेंच्या पठडीत तयार झालेले कार्यकर्ते आहोत. बाळासाहेबांनी देखील माझ्या आंदोलनाचे भाषणात कौतुक केलेले आहे. आजही त्याच्या क्लिप सोशल मीडियावर फिरतात. या एकनाथ शिंदेंने आयुष्य घालवलं संघटनेसाठी तेव्हा हे लोक कुठे होते? संकट आलं, पूर आला, कोविड आला तरी हा एकनाथ शिंदे रस्त्यावर उतरुन काम करत होता. जेव्हा काही लोक त्यांच्या सीमा ओलांडतात, तेव्हा मलाही सीमा ओलांडून बोलावं लागतं आणि म्हणून आमच्या संयमाला आमची हतबलता समजू नका. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. बोलत नाहीत तर थेट करुन दाखवतो, असा इशाराच एकनाथ शिंदे यांनी दिला.

एकनाथ शिंदे यांच्या भाषणानंतर टीकेला अनिल परब यांनी उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांचे काम इतके जबरदस्त आहे की, त्याची ३३ देशांत दखल घेतली गेली. आपण कर्तृत्वावान आहात. आपण ५० लोक घेऊन गेलात आणि सरकार स्थापन केलं. त्यातला एक जरी पडला, तरी राजीनामा देईन, हे तुमचं वाक्य आहे. आपल्या कर्तृत्वाला आमचा सलाम आहे. फक्त एकच हात जोडून विनंती आहे, की बाळासाहेबांच्या पायावर हात ठेवा आणि सांगा की पुढच्या वेळी भाजपाच्या तिकिटावर आम्ही लढणार नाही. याच्यातले किती लोक भाजपाच्या तिकिटावर लढणार आहेत, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. तुम्ही तुमच्या जिवावर आम्हाला हरवलंत, तर आम्ही तुमचं स्वागत करू. आम्हाला अजिबात वाईट वाटणार नाही. पण भाजपाच्या मदतीने आम्हाला हरवणार असाल तर आम्हाला वाईट वाटेल.

अनिल परब यांना प्रत्युत्तरदेताना शिंदे म्हणाले, तुम्ही निवडून आलात, तेव्हा भाजपाची मदत लागली तुम्हाला. ज्या दिवशी बाळासाहेबांचे विचार सोडून तुम्ही खुर्चीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलात, त्या दिवशी बाळासाहेबांच्या पायाला हात लावायचाही अधिकार तुम्हाला राहिला नाही. तो अधिकार आम्हाला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *