कर्नाटक सरकारने आव्हानाची भाषा करत आगीशी खेळण्याचा प्रयत्न करू नका – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

२९ डिसेंबर २०२२


महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर राज्याने नेहमीच संयमाची भूमिका घेतली आहे. मात्र कर्नाटक सरकारकडून सीमा भागातील मराठी जनतेवर सातत्याने अन्याय केला जात असून महाराष्ट्राची एक इंचही जमीन देणार नाही. त्यामुळे कर्नाटक सरकारने आव्हानाची भाषा करू नये असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी कर्नाटक सरकारला दिला.

सीमावाद प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही कर्नाटकच्या वतीने महाराष्ट्रातील जनतेच्या मनात चीड निर्माण करणारी वक्तव्ये केली जात आहेत. महाराष्ट्राने कायम संयमाची भूमिका घेत कोणत्याही वादावर तोडगा काढला आहे. मात्र या संयमाची परीक्षा घेऊ नका. आम्ही माणुसकी ठेवून काम करत असताना दुर्दैवाने कर्नाटक सरकार तेथील मराठी माणसावर अन्याय करत आहे. गुन्हे दाखल करत आहेत. त्यामुळे आगीशी खेळण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा शिंदे यांनी दिला. तसेच सीमाभागातील मराठी जनतेवर दाखल गुन्हे, खटले, सरकारतर्फे वकील देण्याची घोषणाही त्यांनी केली. सीमाप्रश्नाचा पाठपुरावा करण्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई कुणाच्या बापाची नाही, ती मराठी माणसाची आहे, महाराष्ट्राची आहे. मुंबईवर जेव्हा जेव्हा संकटे आली, तेव्हा तेव्हा मुंबईकरांनी एकत्र येऊन लढा दिला. करोनाकाळात याचा प्रत्यय आला आहे. राज्यात कन्नड लोक आनंदाने राहतात. यातील अनेकजण मोठा व्यवसाय करत आहेत. कर्नाटक सरकारकडून मराठी माणसांवर अन्याय सुरू झाला, तेव्हा मुंबईतील कानडी लोक भेटले आणि त्यांनीही कर्नाटकच्या भूमिकेचा निषेध केल्याचे शिंदे यांनी सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *