रोहित खर्गे, पुणे विभागीय संपादक
पिंपरी : दि ४ डिसेंम्बर २०
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने महिला व बालकल्याण, मागासवर्गीय, अपंग कल्याणकारी व इतर विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्यासाठी अर्ज स्वीकृतीसाठी 25 नोव्हेंबरपर्यंत एक महिन्याची मुदत होती. त्याला 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे महापालिकेचे महापौर उषा ढोरे व सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी शुक्रवारी (दि.4) सांगितले. या योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
लॉकडाऊनमुळे अनेकांना आवश्यक कागदपत्रे जमा करता आली नाहीत किंवा उपलब्ध झाली नाहीत. त्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी नगरसेवकांसह पदाधिकार्यांनी केली होती. त्यामुळे अर्ज स्वीकृतीस 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
अर्ज वाटप आणि स्विकृती शहरातील सर्व नागरी सुविधा केंद्रांमध्ये सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत सुरू आहे. अर्ज मोफत आहेत. अर्ज भरून दिल्यानंतर 20 रूपये शुल्क आहे. या योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन ढोरे व ढाके यांनी केले आहे.