अध्यक्ष महोदय हे काय चाललंय; फोन टॅपिंग प्रकरणावरून अजित पवारांनी भर सभागृहात विचारला जाब

२२ डिसेंबर २०२२


फोन टॅपिंग प्रकरणावरून विधानसभेतून विरोधी पक्षाकडून सभात्याग करण्यात आला आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. विधानसभेत अजित पवार, नाना पटोले यांनी रश्मी शुक्लांचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच अजित पवार यांनी अध्यक्षांवर राज्य सरकारला पाठिशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

अजित पवारांनी सभागृहात फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित करताना सदस्याच्या अधिकारांचं रक्षण करण्याचं आवाहन सभागृह अध्यक्षांना केलं. कोणी सदस्य असतं, कोणी मंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष असतं. या सरकारच्या मागच्या काळात एक लक्षात आलं की त्यावेळचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि सभागृहाचे सदस्य नाना पटोले, माजी राज्यमंत्री बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख, माजी खासदार संजय राऊत, एकनाथ खडसे अशा अनेक राजकीय नेत्यांचे कोणतंही प्रबळ कारण नसताना फोन टॅप करण्यात आले. त्याची चौकशी करण्यात आली. त्यावेळी एक जबाबदार ज्येष्ठ महिला आयपीएस अधिकारी त्यात संबंधित आहे हे लक्षात आलं. त्यांचं नाव रश्मी शुक्ला असं अजित पवार यावेळी म्हणाले.

कुणाच्या आदेशाने रश्मी शुक्ला फोन टॅप करत होत्या? याचा खटला चालू होता. सूत्रधाराचा पर्दाफाश होईल, अशी भीती विद्यमान सरकारच्या मनात आली का? भारतीय टेलिग्राफ अॅक्टचं उल्लंघन करण्यात आलं. विधिमंडळ सदस्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच केला गेला. हे लोकशाहीला घातक नाही का? अशा अधिकाऱ्याला का पाठिशी घातलं जातं? शेवटी तो तपास थांबवण्याचा प्रयत्न केला गेला. उच्च न्यायालयाने मध्यस्थी करून सांगितलं की अशा प्रकारे तुम्हाला प्रकरण मागे घेता येणार नाही. अध्यक्ष महोदय हे काय चाललंय? असे म्हणत अजित पवार यांनी जाब विचारला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *