विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आहारी न जाता अभ्यास, खेळाची सवय लावून घ्या : अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील

प्रतिनिधी : सुहास मातोंडकर

दि.२२ डिसेंबर २०२२

पिंपरी


पिंपरी  :शालेय विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आहारी न जाता अभ्यास, व्यायाम आणि खेळाच्या सवयी लावून घेतल्यास चांगले आरोग्य लाभून आत्मविश्वास दृढ होईल, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त् प्रदीप जांभळे पाटील यांनी केले. सायन्स पार्क येथे आज सकाळी पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण विभाग, स्मार्ट सिटी व सायन्य् पार्क यांच्यावतीने “आपले शहर जाणून घ्या” उपक्रमांतर्गत “विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी, शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, सायन्य पार्कचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार कासार, शिक्षणाधिकारी सुनिल पोटे, स्मार्ट सिटी, स्मार्ट टीमचे प्रतिनिधी यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. संवाद कार्यक्रमात फुगेवाडी, भोसरी, खराडवाडी, आकुर्डी, नेहरूनगर, पिंपळे सौदागर, केशव नगर, कासारवाडी, काळभोर नगर, पिंपरीगाव, वाकड, संत तुकाराम नगर, पिंपळे गुरव, लांडेवाडी, रुपीनगर येथील मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

            शहरातील मनपा व खाजगी सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढून आपल्या शहराबाबत माहिती होण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत “अर्बन आउटकम फ्रेमवर्क २०२२” उपक्रमांतर्गत “आपले शहर जाणून घ्या” हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. सायन्य पार्क येथून अतिरिक्त आयुक्त् प्रदीप जांभळे पाटील यांच्या उपस्थितीत प्रभात फेरीला सुरुवात झाली. तसेच या उपक्रमामध्ये शहरातील ५००हून अधिक शाळांमधील जवळपास ३ लाख २६ हजार विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवून आपल्या शाळेच्या ५०० मीटर परिसरात प्रभात फेरी काढून “स्वच्छ पिंपरी चिंचवड शहर” या संकल्पनेबाबत जनजागृती केली.

तत्पूर्वी, विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे उत्तरे देवून त्यांच्यासोबत दैनंदिन उदभवणा-या समस्यांचे निराकरण कसे करावे, याबाबत मोलाचा सल्ला दिला. ते पुढे म्हणाले, विद्यार्थी जिवनापासूनच चांगल्या सवयी लावणे आवश्यक आहे. शालेय शिक्षणासोबतच आपल्या आजूबाजूला घडणा-या दैनंदिन घटनांची देखील माहिती विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. मनाची तयारी, जिदद, चिकाटी असेल तर स्पर्धा परिक्षाच नव्हे तर जगाच्या पाठीवरील कोणत्याही परिक्षेत उत्तीर्ण होणे अवघड नाही. त्यासाठी अभ्यासाचे वेळापत्रक तयार करायला हवे, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने आपले विचार मांडून महापालिकेच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. तसेच “चला शहर जाणून घेवूया” या उपक्रमाच्या आयोजनाबाबत महापालिकेचे आभार मानले.

उपायुक्त संदीप खोत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महापालिका व शिक्षण विभागाद्वारे जल्लोष शिक्षणाचा २०२३ या उपक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले की, ‘जल्लोष शिक्षणाचा २०२३’ हा उपक्रम नाविन्यपूर्ण गोष्टींना अनुसरून आहे. शाळांच्या सर्जनशील कल्पना, मुलांच्या कलागुणांना उत्तम व्यासपीठ मिळावे, यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. स्पर्धेतील विजेत्या शाळा आणि विद्यार्थ्यांना महापालिकेच्या वतीने बक्षिस देण्यात येणार आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टी देखील माहित असल्या पाहिजे. मुलांना आपल्या शहराबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. महापालिकेच्या वतीने शहरामध्ये कोणते उपक्रम राबविले जात आहेत. याबद्दल विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना आपल्या शहराबाबत काय मत आहे, हे जाणून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने अर्बन आउटकम्स फ्रेमवर्क या उपक्रमांतर्गत ‘चला आपले शहर जाणून घेऊया’ याबाबत शहरात सर्वेक्षण सुरु आहे. या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त शाळांचा सहभाग अपेक्षित आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावयाचे आहे. या उपक्रमाद्वारे आपले शहराबद्दलचे मत नोंदवून पिंपरी चिंचवड शहराला देशात प्रथम क्रमांकाने विजयी करायचे आहे. विद्यार्थ्यांमार्फत पालकांपर्यंत हा संदेश पोहोचवल्यास हे सर्वेक्षण व्यापक प्रमाणात होण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *