चिमणी संवर्धनासाठी विठ्ठलवाडी येथील पांडुरंग विद्यालयाचा सलग सातव्या वर्षी ही प्रकल्प : प्रकल्पाचे विविध स्तरावरून होतेय कौतुक

रवींद्र खुडे
विभागीय संपादक 
७ एप्रिल २०२२

विठ्ठलवाडी/शिरूर


विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील श्री पांडुरंग विद्या मंदिरातील शालेय विद्यार्थ्यांनी, चिमणी संवर्धनासाठी पुढाकार घेत कृत्रिम घरटी बनवून शालेय परिसरात लावलेली आहेत. ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात चिमणी संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ कृत्रिम घरटी, धान्य, पाणी ठेवण्यासाठी प्लॅस्टिक बरण्यांपासून आकर्षक भांडी बनवून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिलाय. शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथील उपक्रमशील शाळा, श्री पांडुरंग विद्यामंदिरातील इयत्ता पाचवी व सहावीच्या पक्षीप्रेमी विद्यार्थ्यांनी, स्वच्छ, सुंदर शाळा विभाग प्रमुख प्रवीणकुमार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, विद्यालयाच्या नैसर्गिक परिसरात सलग सातव्या वर्षी पर्यावरण पूरक उपक्रम राबवलाय. या प्रकल्पाचे कौतुक मुख्याध्यापक सुरेश थोरात, भाऊसाहेब वाघ, तसेच शाळाप्रेमी व पक्षीप्रेमींनी केलेय. रखरखत्या उन्हात कासावीस झालेल्या चिमण्यांना मायेची ऊब मिळावी यासाठी, टाकाऊ पासून टिकाऊ प्रकल्पांतर्गत पुठ्यांच्या खोक्यांची अनेक घरटी व गोळ्या बिस्किटांच्या प्लॅस्टिक बरण्यापासून धान्य व पाणी ठेवण्यासाठी आकर्षक भांडी तयार केलेली आहेत. तर काही विद्यार्थ्यांनी चिऊताईची तहान भागवण्यासाठी, यूज अँड थ्रो च्या पाण्याच्या बाटलीतून, चिमण्या व इतर छोट्या पक्षांची इवलीशी भूक भागवण्यासाठी, “एक घास चिऊचा……एक घास काऊचा” असे म्हणत मुठभर धान्य देऊ केले आहे.

समाजात चांगले पर्यावरणप्रेमी नागरिक घडायचे असतील तर, या बाल चिमुकल्यांना पर्यावरणाचे धडे शाळेतूनच मिळणे गरजेचे असल्याने, स्वच्छ, सुंदर शाळा प्रकल्पांतर्गत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील बालचमूंनी चिमण्यांच्या सुरक्षेसाठी टाकाऊ पासून टिकाऊ अंतर्गत कृत्रिम घरटी तयार केलेली आहेत आणि ती घरटी शालेय परिसरात तसेच स्वतःच्या घराच्या परिसरात लावलेली आहेत. सध्या वाढता कडाक्याचा उन्हाळा यामुळे चिमण्या शाळेच्या इमारतीच्या व्हरांड्यात घिरट्या घालत असल्याने, कासावीस झालेल्या चिमण्यांचे संरक्षण करण्यासाठी व्हरांड्यात ठिक-ठिकाणी विद्यार्थ्यांनी तयार केलेली कृत्रिम घरटी बसवताच, क्षणाचाही विलंब न लावता या घिरट्या घालणाऱ्या चिमण्या, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या कृत्रिम घरट्यांमध्ये विसावल्याचे पाहून, विद्यार्थी देखील खूप आनंदीत झालेत. या कृत्रिम घरट्यांंमुळे चिमण्यांची संख्या वाढत असल्याचे दिसत असुन, सलग सात वर्ष हा प्रकल्प शाळेत राबविला जात आहे. त्यामुळे चिमण्यांचा चिवचिवाट वाढला असुन, “जणू काही चिऊ ताईची शाळा सुरू झाली की काय” ? असे वातावरण शालेय परिसरात निर्माण झालेय. विद्यार्थ्यांच्या या कृतीमुळे पक्षी संवर्धनाचा संदेश बाल मनावर कोरला गेल्याने, या विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाचे धडे गिरवत असतानाच, “आठवूनी काऊचा घास, घेऊन चिमण्यांचा संवर्धनाचा ध्यास” असल्याचे चित्र येथील शालेय परिसरात पहावयास मिळते आहे. या उपक्रमाचे कौतुक पर्यावरणप्रेमी युवक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल संभाजी गवारे यांनी देखील प्रत्यक्ष भेट देत केलेले आहे. (शब्दांकन :- प्रवीणकुमार जगताप, विभाग प्रमुुख, स्वच्छ सुंदर शाळा प्रकल्प)


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *