महाविकास आघाडीचा आज महामोर्चा तर भाजपचे माफी मांगो आंदोलन; ठाणे बंदची हाक

१७ डिसेंबर २०२२


महापुरुषांचा अपमान, मंत्र्यांची बेताल विधानं आणि प्रकल्प गुजरातला पळवण्याच्या मुद्दावर महाविकास आघाडीने महामोर्चाची हाक दिली आहे. आज सकाळी ९.३० वाजता रिचर्डसन अँड कृडास, नागपाडा, मुंबई येथून या मोर्चाला सुरवात होईल. या पार्श्वभूमीवर मविआकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि अन्य भाजप नेत्यांचे छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रिबाई फुले व अन्य महापुरुषांविषयी बेताल वक्तव्ये, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्रद्रोही विधाने, सीमाप्रश्नी इतर राज्यांमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांच्या कटकारस्थानास राज्य सरकारची फूस असणे, सत्ताधारी नेत्यांची महिला व अन्य नेत्यांविरुद्ध बेताल वक्तव्ये तसेच महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला नेऊन राज्यातील तरुणांची फसवणूक केल्यामुळे महाविकास आघाडीकडून राज्य सरकारविरोधात आज महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यात महाविकास आघाडी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.

तर, शिवसेना खासदार संजय राऊतांनी डॉ.बाबसाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळाचा चुकीचा उल्लेख केल्याविरोधात भाजपचे आज मुंबईत माफी मागो आंदोलन करण्यात येणार आहे. मविआच्या नेत्यांविरोधात भाजप आंदोलन करणार आहे. प्रसाद लाड, तमिल सेल्वन यांच्या उपस्थितीत हे आंदोलन आंदोलन करण्यात येईल. हिंदू देव-देवता, संत-महंतांबद्दल सतत व्देषपूर्ण विधाने करुन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या, वारकरी संप्रदायाचा अपमान करत भाषणे देत राज्यभर फिरणाऱ्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा निषेध करण्यासाठी वारकरी संप्रदायाने आज ठाणे बंदची हाक दिली आहे. सदर बंदला बाळासाहेबांची शिवसेना व भारतीय जनता पार्टी यांचा पाठिंबा दिला आहे. तसेच, शनिवारी कल्याण, डोंबिवली बंद ठेवण्याचा निर्णयही सर्व हिंदुत्ववादी संघटना, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने घेतला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *