सायबर चोरट्यांचा व्यावसायिकाला तब्बल ३७ लाख रुपयांचा गंडा

१६ डिसेंबर २०२२

पुणे


हायड्रॉलिक अॅसिड एक्स्ट्रॉक्ट ऑईल (सूर्यफुलाचे तेल) भारतात खरेदी करून विदेशात पाठविण्याच्या बहाण्याने तिघा सायबर चोरट्यांनी पुण्यातील एका व्यावसायिकाला तब्बल ३७ लाख रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी, सहकारनगर पोलिसांनी जेसी सारा, खुशबू दत्ता, फ्रॉक डेव्हिस या तिघांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सातारा रोड परिसरातील एका ५३ वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जेसी सारा व फिर्यादींची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर तिने फिर्यादींसोबत संपर्क वाढवून इतर आरोपींसोबत संगनमत करून फिर्यादींना हायड्रॉलिक अॅसिड एक्स्ट्रॉक्ट ऑईल (सूर्यतेल) त्यांच्या कंपनीच्या वतीने भारतात खरेदी करून विदेशात पाठवून मोठा नफा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखविले.

फिर्यादी आरोपींनी दाखविलेल्या आर्थिक प्रलोभनाला बळी पडून खुशबू दत्ता नावाच्या बँक खातेधारकाच्या नावावर वेळोवेळी ३७ लाख रुपये पाठविले. मात्र, त्यानंतर देखील त्यांना मालाची (तेलाची) डिलिव्हरी देण्यात आली नाही, तसेच गुंतवणूक केलेले पैसेही परत दिले नाहीत. त्यामुळे फिर्यादींनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर तपास करीत आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *