सभेतून बोलल्याने आणि फेसबूकवर गोड गोड बोलून मतं मिळत नाही; बच्चू कडू यांची ठाकरेंवर टीका

१४ डिसेंबर २०२२


शिंदे गटाला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडूंनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली. केवळ भाषण दिल्यानं मते मिळत नाहीत असं म्हणत आमदार बच्चू कडू यांनी राज ठाकरेंवर टीका केली. तर फेसबुकवर गोड गोड बोलून मतं मिळत नाहीत, असा टोला बच्चू कडूंनी उद्धव ठाकरे लगावला आहे. बच्चू कडू यांनी राज ठाकरेंसह उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

आपण मनसे पाहिला असेल, ते मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा असे म्हणायचे. केवळ बोलण्यानं मते मिळत नसतात असे कडू म्हणाले. मनसेच्या १३ आमदारांना महाराष्ट्र आता विसरुन गेला असल्याचे बच्चू कडू म्हणाले. मी चार वेळा निवडून आलो आहे. जातीचं सोंग नाही, जातीचा झेंडा नाही, धर्माचा झेंडा नाही, कोणताही नेता बोलावला नाही. तुमच्यासारख्या सामान्य माणसांनी देशात इतिहास केला. अपक्ष माणूस एकदा नाहीतर चार वेळा निवडून दिला असल्याचे कडू म्हणाले. माझं काम बघूनच तुम्ही मला निवडून दिल्याचे कडू म्हणाले.

ज्याला हात नाही, पाय नाही, डोळे नाही, ज्याला ऐकू येत नाही त्यांच्यासाठी मी महाराष्ट्रभ फिरलो आहे. या सर्व वेदना विधानसभेत मी मांडल्या आहेत माझ्यावर ३५० गुन्हे दाखल झाले असल्याचे बच्चू कडू यावेळी म्हणाले. राज ठाकरेंना, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना विचार बर किती गुन्हे दाखल आहेत? असा सवालही बच्चू कडूंनी केला. फक्त फेसबूकवर गोड गोड बोलून मतं मिळत नाही असेही ते म्हणाले. बोल बच्चन करुन काही होत नाही. कर्म, कर्तव्य करणं गरजेचं आहे. कष्ट करावं लागते. जात आणि धर्म लावला तर पक्ष वाढवायला वेळ लागत नाही. पक्ष सहज पक्ष वाढतो असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *