अमिताभ गुप्ता यांची बदली, रितेश कुमार पुण्याचे नवे पोलीस आयुक्त

१४ डिसेंबर २०२२


राज्यातील पंधरा आयपीएस अधिकाऱ्यांच्या प्रमोशनवर बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली मुंबई अपर पोलीस महासंचालकपदी (कायदा व सुव्यवस्था) करण्यात आली आहे. त्यांच्या जागी रितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्तपदाचा सोमवारी पदभार स्वीकारणार असल्याचे रितेशकुमार यांनी सांगितले. रितेश कुमार यांनी कोल्हापूर, सांगली, नांदेड, लातूर या जिल्ह्यात काम केलं आहे. त्यांनी राज्य राखीव पोलीस दलात देखील काम केलं असून ते मुंबईत काहीकाळ पोलीस उपायुक्त राहिलेले आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये त्यांना राष्ट्रपती पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तपदी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक विनयकुमार चौबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची नाशिक पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. पुण्यातील अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांची सीआयडीमध्ये पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

मुंबई म्हाडा येथील मुख्य दक्षता अधिकारी व अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अपर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मोटार परिवहन विभागाचे विशेष पोलीस महासंचालक सुनिल फुलारी यांची नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली केली आहे. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीचे संचालक प्रवीण पवार यांची कोकण परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. गृह विभागाने मंगळवारी अपर पोलीस महासंचालक, सह आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *