बेकायदेशीर आंदोलन करणाऱ्या रिक्षा चालकांविरुद्ध गुन्हा दाखल
१४ डिसेंबर २०२२
पुणे
रॅपीडो बाईक टॅक्सी बंद होण्यासाठी रिक्षा चालकांच्या प्रमुख मागणीसाठी बाईक टॅक्सी विरोधी आंदोलन समीती पुणे यांनी सोमवारी सकाळपासुन पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरू केले. या प्रकरणी पोलिसांनी बेकायदेशीर आंदोलन करणाऱ्या रिक्षा चालकांसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात केला आहे. एकुण ३७ रिक्षा चालक व रिक्षा संघटनांचे पदाधिकारी यांना मंगळवारी अटक करण्यात आली.
आंदोलनकर्ते बघतोय रिक्षावाला फोरम अध्यक्ष डॉ. केशव क्षिरसागर, आम आदमी रिक्षा चालक संघटना अध्यक्ष आनंद अंकुश, पुणे जिल्हा वाहतुक सेवा संघटना संजय कवडे, शिवनेरी रिक्षा संघटना अध्यक्ष अशोक साळेकर, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेना अध्यक्ष किशोर चिंतामणी, आरपीआय वाहतुक आघाडी अध्यक्ष अजीज शेख, पी आशिर्वाद रिक्षा संघटना अध्यक्ष फारुक बागवाले, एआयएमआयएम रिक्षा चालक संघटना अध्यक्ष बाबा सैय्यद, शिवा वाहतुक संघटना अध्यक्ष शिवा भोगनळी व इतर रिक्षा संघटनांचे पदाधिकारी यांची बैठक घेऊन अशा प्रकारे बेकायदेशीर आंदोलन करू नये, असे अवाहन पोलिसांनी केले होते. पोलीसांनी केलेल्या अवाहनाला प्रतिसाद देत चक्का जाम आंदोलनामुळे नागरीकांची गैरसोय होऊ नये म्हणुन महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी सदरचे आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला. परंतु उर्वरित इतर रिक्षा संघटनांचे पदाधिकारी हे त्यांच्या आंदोलनावर ठाम राहिल्याने पोलिसांनी त्यांना नोटीस दिल्या होत्या.