अलंकापुरीत हैबतबाबा दिंडीची नगरप्रदक्षिणा; एकादशीनिमित्त दर्शनास गर्दी, माऊलींच्या गाभाऱ्यात पुष्प सजावट

०५ डिसेंबर २०२२


आळंदी येथील माऊली मंदिरात एकादशी दिनी प्रथा परंपरांचे पालन करीत श्रींची पूजा सायंकाळी भागवत एकादशी निमित्त हैबतबाबा यांचे दिंडीची ग्रामप्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. श्रींचे दर्शनास भाविक, नागरिकांनी गर्दी करून दर्शन घेतले. आळंदी मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती. दरम्यान आळंदीत लग्न,रविवार,एकादशी निमित्त आलेल्या वाहनांमुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी ठिकठिकाणी झाली. विविध चौकात मात्र वाहतूक कोंडी दूर करण्यास वाहतूक पोलिसांची दमझाक झाली. धुळीचे त्रासाने गैरसोयीत वाढ झाली.

भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीत स्नान करीत अनेक भाविकांनी तीर्थक्षेत्री स्नान माहात्म्य जोपासले. श्रींचे दर्शन तसेच मंदिर प्रदक्षिणा, ग्रामप्रदक्षिणा करीत अलंकापुरीत एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. भाविकांनी परंपरांचे पालन करीत आळंदीत हरिनाम गजर करीत अनवाणी पायाने नगरप्रदक्षिणा केली. आळंदी मंदिरातील परंपरांचे पालन करीत आळंदी देवस्थानने एकादशी दिनी धार्मिक उपक्रम आणि फराळाचा प्रसाद वाटप केला. महिला, पुरुष वारकरी भाविकांनी दर्शनबारीतील रांगेतून दर्शन घेतले.

भाविकांना कमी वेळेत सुलभ दर्शन होण्यासाठी प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांचे मार्गदर्शनाखाली व नियंत्रणात मंदिर व्यवस्थापक माऊली वीर यांनी नियोजन केले. यावेळी बाळासाहेब रणदिवे चोपदार, मालक बाळासाहेब आरफळकर, योगेश सुरू, बाळासाहेब कु-हाडे, श्रींचे पुजारी क्षेत्रोपाध्ये वेदमूर्ती ब्रम्हवृंद आळंदी, श्रीधर सरनाईक, ज्ञानेश्वर पोंधे, संजय रणदिवे, सोमनाथ लवंगे, श्रीकांत लवांडे यांचेसह सेवक कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, पोलीस बंदोबस्तावरील कर्मचारी यांनी धार्मिक उपक्रमास तसेच भाविकांचे सुलभ दर्शन व्यवस्थेस परिश्रम घेतले. रात्री मोझे महाराज यांचे वतीने जागर सेवा रुजू झाली. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस सुनील गोडसे, रमेश पाटील, वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांचे मार्गदर्शनाखाली आळंदीत पोलीस बंदोबस्त आणि वाहतूक कोंडी सुरळीत करण्यास कर्मचारी यांनी काम पाहिले. आजोळघर दर्शनबारी, इंद्रायणी नदी घाट,प्रदक्षिणा मार्ग, मरकळ चौक, देहू फाटा, चाकण चौक, वाहन पार्किंग परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती. शांतता सुव्यवस्था तसेच पोलिस बंदोबस्तासाठी आळंदी पोलिस यंत्रणेने परिश्रम घेतले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *