मंदिरे उघडणार असल्यामुळे श्रीक्षेत्र ओझर येथे भाविक, व्यापाऱ्यांमध्ये उत्साह

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
०६ ऑक्टोबर २०२१

नारायणगाव

मंदिर प्रशासनाची दर्शन व्यवस्थेची तयारी पूर्ण – अध्यक्ष गणेश कवडे

कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे मार्च २०२० पासून बंद असलेल्या राज्यातील मंदिरांसह सर्वच धार्मिक स्थळे घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर सुरु करण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे भाविकांमध्ये उत्साह पहायला मिळत आहे.

याच अनुषंगाने जुन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र ओझर व पंचकृषितील जनतेमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या या घोषणेमुळे राज्यातील जनतेला तसेच अष्टविनायकातील तीर्थक्षेत्र ओझर येथील जनतेला, व्यापारी वर्गाला व भाविकांना दसरा व दिवाळीची जणू अनोखी भेट मिळाली असल्याचे श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे यांनी सांगितले.

तब्बल अठरा महिन्यानंतर राज्यभरातील मंदिरे दर्शानासाठी सर्वांसाठी सुरु होणार असल्याने भाविकांमध्ये तसेच मंदिरावर अवलंबून असणाऱ्या सर्व छोट्या मोठ्या व्यावसायिकांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे.

सरकारच्या या निर्णयाचे सर्वानीच स्वागत केले आहे . कोरोना व्हायरस आणि त्यानंतर लागू झालेल्या लॉकडाऊन मुळे राज्यातील मंदिरे मार्च २०२० पासून बंद होती.
सरकारच्या घोषणेनंतर अष्टविनायाकांतील मुख्य स्थान असलेले व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विघ्नहर गणपती ओझर चे मंदिर देखील ७ ऑक्टोबर पासून भाविकांना दर्शनासाठी पहाटे ५ वाजल्यापासून उघडणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष गणेश कवडे यांनी दिली. भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. कोव्हीडचे संकट अजून संपलेले नाही. त्यामुळे राज्यशासनाकडून जे नियम घालून दिलेले आहेत ते संपूर्णपणे पालन करूनच भाविकांना दर्शन दिले जाईल. तसेच ओझर देवस्थानच्या वतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आपण आभारी आहोत असे अध्यक्ष गणेश कवडे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *