आंद्रा धरणातील १०० एमएलडी पाण्यासाठी प्रतीक्षा संपली!

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०२ जून २०२२

पिंपरी


पिंपरी-चिंवचडमधील पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, तांत्रिक बाबी पूर्ण करुन अवघ्या १० ते १२ दिवसांत पाणी पुरवठा सुरू होईल, अशी माहिती भाजपा प्रवक्ते आणि माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली.

अवघ्या १० दिवसांत पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार पाणी

भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पाच्या चिखली येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी माजी महापौर राहुल जाधव, नितीन काळजे, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, कुंदन गायकवाड किसन बावकर, दिनेश यादव, माजी नगरसेविका साधना मळेकर, निलेश नेवाळे, जितेंद्र यादव आदी उपस्थित होते.

भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांची प्रकल्प पाहणी

दरम्यान, चिखलीतील १०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर आमदार लांडगे यांनी आयुक्त् राजेश पाटील यांच्यासोबत बैठक घेतली. योजनेचा आढावा घेतला, तसेच प्रशासनाला सूचनाही केल्या आहेत.
यावेळी राजेश पाटील म्हणाले की, आंद्रा धरणातून उचलण्यात येणाऱ्या १०० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी चिखली येथे उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. १० ते १२ दिवसांत पाणी शहरवासीयांना मिळणार आहे.

एकनाथ पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवडकरीता पवना धरणातून पाणी पुरवठा होतो. त्यामुळे पवना धरणाव्यतिरिक्त शहरासाठी पाणी पुरवठ्याचे अन्य स्त्रोत निर्माण करणे गरजेचे होते. भाजपाचे तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मक निर्णय घेतला. महापालिकेतील भाजपाच्या सत्ताकाळात आंद्रा धरणातून १०० एमएलडी आणि भामा आसखेडमधून १६७ एमएलडी पाणी पिंपरी-चिंचवडला मिळण्यासाठी प्रकल्पाला मंजुरी दिली. कोविड आणि लॉकडाउनच्या परिणामामुळे नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यात प्रशासनाला अडचणी आल्या. अखेर सर्व अडचणींवर मात करीत प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकर आता पाण्यासाठी स्वयंपूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *