स्थायी समितीत प्रशासक शेखर सिंह यांनी विविध कामांसाठी ६५ कोटी ४० लाखांची दिली मान्यता

रोहित खर्गे
विभागीय संपादक
३० नोव्हेंबर २०२२

पिंपरी


स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या सुमारे ६५ कोटी ४० लाख  रुपये खर्चाच्या विविध विषयांना प्रशासक  शेखर सिंह यांनी मंजुरी दिली. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये प्रशासक  शेखर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बैठक संपन्न झाली.  या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

 शहरात उभारणार जिजाऊ क्लिनिक

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत ठिकठिकाणी जिजाऊ क्लिनिक उभारण्यात येणार असून इतर अनुषंगिक कामे करण्यात येणार आहेत. याकामी १ कोटी ५७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. महापालिका हद्दीबाहेरील खडकी कॅन्टोनमेंट क्षेत्रात बोपखेल गावासाठी पोहोच रस्ता बांधण्यात येणार असून  इतर अनुषंगिक कामे करण्यात येणार आहेत. याकामी १९ कोटी ३२ लाख रुपये खर्च होणार आहेत. प्रभाग क्र.२० मधील संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयातील चाणक्य कार्यालयाच्या वरती दुस-या मजल्याचे विस्तारीकरण तसेच  नविन शवागृह इमारत बांधणे या कामांतर्गत उर्वरित स्थापत्य विषयक अनुषंगिक कामे करण्यासाठी येणाऱ्या २ कोटी ६० लाख रुपये  सुधारित खर्चास आज मान्यता दिली.  भाटनगर येथील महापालिकेच्या जुन्या मैला शुद्धीकरण केंद्राचे नुतनीकरण करून त्याची क्षमता वाढविण्यात येणार आहे. याकामी येणाऱ्या ३१ कोटी रुपये खर्चासह तरतूद वर्गीकरणाच्या विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *