शेतकऱ्यांसाठी खुशखबर : आता शिरूर कांदा मार्केटमध्ये होणार दररोज जाहीर लिलाव

दि. २०/०१/२०२३

रवींद्र खुडे : विभागीय संपादक

शिरूर

 

शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर कृषि उत्पन्न बाजार समिती येथील नविन मार्केट यार्डवर भरणाऱ्या कांदा मार्केट मध्ये दिवसेंदिवस कांद्याची आवक ही लक्षणीय वाढत आहे. त्यामुळे व्यापारी व शेतकऱ्यांसाठी येथे कांद्यासाठी पर्वणीच असते. परंतु आठवड्याचे काही ठरावीक दिवसच कांदा लिलाव होत असल्यामुळे, अनेक शेतकरी व खरेदीदार, वाहतुकदार यांची कुचंबणा होत होती. त्यांनी याबाबत बाजार समिती तसेच आडतदारांकडे दररोज कांदा मार्केट सुरू करण्याची मागणी केली होती. त्यामुळे बाजार घटकांसोबत चर्चा विनिमय केल्यानंतर सर्वांनी निर्णय घेतलाय की, शनिवार आठवडे बाजारचा दिवस वगळून इतर सर्व दिवस कांदा लिलाव होईल.

सध्या कांदा मार्केटमध्ये दररोज नविन कांद्याची सुमारे 6500 पिशवीची आवक असुन, बुधवार दि. 18 जानेवारी 2023 रोजी चांगल्या प्रतीच्या कांद्यास रू. 1500 ते 1750 प्रती क्विंटल याप्रमाणे दर मिळाला आहे.

शिरूर येथे परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये पिकविलेल्या कांद्यासाठी जवळची आपल्या हक्काची बाजारपेठ मिळालेली असुन शेतकरी वर्ग अत्यंत समाधानी आहे. तसेच शेतकऱ्यांचा वाहतुक खर्च व वेळेची मोठी बचत होत असुन उत्पन्नात भरीव अशी वाढ होत आहे असे यार्डवर कांदा विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगीतले.

कांदा हे पिक शेतकऱ्यांचे नगदी पिक असुन शिरूर यार्डवर शिरूरसह पारनेर, श्रीगोंदा, खेड, दौंड, जुन्नर तालुक्यातुन शेतकऱ्यांना जवळचे मार्केट असल्यामुळे चांगली आवक होत असते. बाजार समितीने यार्डवर शेतकऱ्यांचा कांदा उतरविण्यासाठी प्रशस्त असे चार शेड, लाईट, स्वच्छतागृह, सी.सी.टी.व्ही. इत्यादी आवश्यक त्या पायाभुत सुविधा उभारलेल्या आहेत. पुणे व शेजारील अहमदनगर, नाशिक जिल्ह्यामध्ये हळवा व गरवा जातीचा डबल पत्ती असणाऱ्या कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. हा कांदा टिकाऊ असुन त्यास चांगली मागणी असते. यार्डवरील कांदा कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, तामीळनाडु, पश्चिम बंगाल, झारखंड, आसाम, राजस्थान, दिल्ली, जम्मु काश्मिर इत्यादी राज्यामध्ये विक्रीसाठी जात असतो.

शिरूर मार्केट कमिटीकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेय की, त्यांनी पिकविलेला शेतमाल यार्डवरच विक्रीसाठी आणावा. शेतावर कांदा विक्री केलेल्या अनेक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणुक केलेच्या तक्रारी बाजार समितीकडे येत आहेत. वजन, बाजारभाव तसेच विक्रीच्या रक्कमा याबाबत फसवणुक होऊ शकते. त्यासाठी शिरूर बाजार समितीचे नविन मार्केट यार्डवर रविवार ते शुक्रवार दररोज सकाळी 10 चे आत कांदा विक्रीसाठी आणण्याचे आवाहन बाजार समितीचे प्रशासक शंकर शि. कुंभार यांनी केले आहे.

कांदा विक्रीसाठी आणताना वाळवुन, निवडुन, गुलटी, दुभळका वेगवेगळ्या बारदाण्यात प्रतवारी करून आणावा. यार्डवर कांदा विक्रीचे दर हे नेहमी इतर मार्केटपेक्षा जास्तच निघत असल्याचे सचिव अनिल ढोकले यांनी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *