चित्रा वाघ यांचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल

२९ नोव्हेंबर २०२२


उद्धव ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. या यात्रेदरम्यान त्या जाहीर सभेच्या माध्यमातून भाजपा आणि शिंदे गटावर टीका करत आहेत. सुषमा अंधारे यांच्या याच टीका-टिप्पणींवर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी भाष्य केले आहे. आमची नक्कल करून त्या टाळ्या आणि शिट्ट्या मिळवतात. आमची नावे घेऊन त्यांचे दुकान चालत असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, अशी खोचक टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आमची मिमिक्री करून त्या शिट्ट्या आणि टाळ्या मिळवतात. मात्र मागील अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारने काय दिवे लावले हे जरा महाराष्ट्राला सांगा. त्यांच्या प्रत्येक विधानावर बोललेच पाहिजे, असे काहीही नाही. त्या त्यांचे काम करत आहेत, आम्ही आमचे काम करत राहू. असे कितीही आडवे आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आमचे नाव घेऊन त्यांचे दुकान चालत असेल, तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.

लोकांना लाभ मिळत आहे. लोकांच्या खात्यात पैसे जात आहेत, हे कोणीही नाकारू शकत नाही. राज्य, केंद्र सरकार कित्येक योजना राबवत आहे. आता सर्वांनाच शेतकरी आठवत आहे. आता ते शाताच्या बांधावर जात आहेत. सत्तेत असताना अडीच वर्षे ते झोपले होते. तेव्हा यांना कधी बळीराजाची आठवण आली नाही. १४० एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या, तेव्हा हे झोपले होते अशी खोचक टीका चित्रा वाघ यांनी केली.त्यांनी बांधावर जाऊन मोठ्या वल्गना केल्या. मात्र त्यांनी काहीही केले नाही. महाराष्ट्रात जेव्हा अतिवृष्टी झाली तेव्हा एनडीआरएफचे निकष शिंदे-फडणवीस सरकारने बदलले. शेतकऱ्यांना तिप्पट नुकसान भरपाई दिलेली आहे,” असे चित्रा वाघ यांनी सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *