पवना, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प कागदावरच

१८ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


गेल्या दहा वर्षांपासून चर्चेत असलेला पवना व इंद्रायणी नदी सुधारप्रकल्प अद्याप कागदावरच आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडला पवना नदीचे प्रदूषित पाणी प्रक्रिया (शुद्धीकरण) करून तर, देहू व आळंदीत येणाऱ्या भाविकांना इंद्रायणी नदीचे रसायन व मैलामिश्रित पाण्यातच स्नान करावे लागत आहे. इंद्रायणीचे पाणी आरोग्यासाठी घातक असल्याचे माहीत असूनही भाविक तीर्थ म्हणून त्या पाण्याचा उपयोग करतात. त्यामुळे या दोन्ही नद्यांचे प्रदूषण केंव्हा संपणार आणि नदी सुधार प्रकल्प केव्हा पूर्ण होणार असा प्रश्न आळंदीतील कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने पुन्हा उपस्थित झाला आहे. नदीसुधार प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालयाकडे दोन मे २०१२ रोजी सादर केला होता. त्यानंतर सुधारित प्रकल्प अहवाल महापालिकेने राज्य सरकारला १४ ऑगस्ट २०१३ रोजी सादर केला होता. पवना व इंद्रायणी सुधार प्रकल्पांचे सर्वेक्षण महापालिकेतर्फे नियुक्त सल्लागार समितीने २०१८ मध्ये पूर्ण केले आहे. त्यासाठी कर्जरोख्यांद्वारे निधी उभारण्याच्या प्रस्तावास गेल्या वर्षी सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे.

इंद्रायणी – शहराच्या उत्तरेकडून इंद्रायणी नदी वाहते. तिच्या काठावरच संत तुकाराम महाराज यांचे देहू आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचे आळंदी हे तीर्थक्षेत्र आहेत. या नदीमध्ये पिंपरी-चिंचवड, चाकण औद्योगिक परिसरासह लगतच्या गावातील सांडपाणीही गटारे, सांडपाणी वाहिन्या व नाल्यांद्वारे सोडले जाते. त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढले आहे. पवना  शहराच्या मध्यातून नदी वाहते. त्यामध्ये शहरातील सांडपाणी मिसळले जाते. रावेत येथील बंधाऱ्यातून शहरासाठी अशुद्ध जलउपसा केला जातो.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *