पण सावरकरांबद्दल प्रश्न कुणी विचारावा?; देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर

१७ नोव्हेंबर २०२२


राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपानं यावरून ठाकरे गटावर टीका करायला सुरुवात केली असताना आता उद्धव ठाकरेंनी या टीकांना प्रत्युत्तर दिलं आहे.बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिनाच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. देवेंद्र फडणवीसांनी बुधवारी एकार कार्यक्रमात बोलताना राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या विधानाचा उल्लेख करून त्यावरून शिवसेनेवर टीका केली होती. देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मला आनंद वाटला की देवेंद्र फडणवीसांनी हा मुद्दा उपस्थित केला. मी अत्यंत स्पष्टपणे सांगतोय, की स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आमच्या मनात नितांत आदर, प्रेम आणि श्रद्धा आहेच. ती कुणीही पुसू शकणार नाही. पण सावरकरांबद्दल प्रश्न कुणी विचारावा? ज्यांचा स्वातंत्र्यलढ्याशी सुतराम संबंध नाही, अशा मातृसंस्थेच्या मुलांनी किंवा पिल्लांनी स्वातंत्र्यवीरांबद्दल प्रेम व्यक्त करणं हे हास्यास्पद आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

ते म्हणतील तुम्ही कुठे होतात तेव्हा? आम्ही तेव्हा नव्हतोच. पण ज्यांना आता एक-दोन वर्षांत १०० वर्ष होणार आहेत, तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तेव्हा होता. पण स्वातंत्र्यलढ्यापासून ते चार हात लांब होते. त्यांनी स्वातंत्र्यवीरांबद्दल बोलण्याचा प्रयत्न करू नये. त्यांना तो अधिकार नाही. सावरकरांनी ज्या स्वातंत्र्यासाठी त्याग केला, ते स्वातंत्र्य धोक्यात आल्यानंतर ते अबाधित राखण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. म्हणून हा पाचकळपणा त्यांनी आता बंद करावा. आधी आपल्या मातृसंस्थेचं स्वातंत्र्यलढ्यातलं योगदान काय आहे, ते सांगावं. आणि मग आम्हाला प्रश्न विचारावेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *