मंदौस चक्रीवादळ, राज्यात तीन दिवस पावसाचा इशारा

१० डिसेंबर २०२२

पिंपरी


बंगालच्या उपसागरात तयार झालेले मंदौस चक्रीवादळ शनिवारी पहाटे पदुच्चेरी आणि श्रीहरीकोटा दरम्यान महाबलीपुरमजवळ जमिनीवर प्रवेश करणार आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू, पद्दुचेरी आणि आंध्र प्रदेश या तिन राज्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. या तिन राज्यांव्यतिरिक्त महाराष्ट्रातही या वादळाचा परिणाम जाणवणार आहे.

शुक्रवारी मध्यरात्री आणि शनिवारी सकाळपर्यंत मंदौस चक्रीवादळ पश्चिम-उत्तर-पश्चिमेकडे सरकणार आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ६५ किमी ते ८५ किमी असणार आहे. समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या भागांना वादळाचा फटका बसला आहे. मुसळधार पावसाने काहि जिल्ह्यांना झोडपून टाकले आहे. तामिळनाडूच्या किनाऱ्यावर वादळ पोहोचल्यावर कोडाइकनालमधील विविध भागात मुसळधार पाऊस झाला आहे.

बंगालच्या उपसागरातून तामिळनाडूकडे आलेल्या चक्रीवादळाचा वेग मंदावला असून ते भारतीय किनारपट्टीजवळ आले आहे. दरम्यान, याचा महाराष्ट्रावर प्रभाव दिसणार असून ११ ते १३ डिसेंबर दरम्यान राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *