पुणे महापालिकेत पुन्हा भरती

०८ नोव्हेंबर २०२२

पुणे


महापालिकेत नुकतीच साडेचारशे पदासाठीची कर्मचारी भरती प्रक्रिया राबविण्यात आल्यानंतर आता पुन्हा नव्याने कर्मचारी भरती करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. आरोग्य, अग्निशमनसह विविध संवर्गातील दोनशेहून अधिक पदांसाठी भरती केली जाणार आहे अशी माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

महापालिकेत कनिष्ठ अभियंता, लिपिक, सहायक अतिक्रमण निरीक्षक आणि सहायक विधी अधिकारी यांच्या तब्बल 448 जागांसाठी कर्मचारी भरती झाली. या भरती प्रकियेत कोणताही गैरव्यवहार होऊ नये, यासाठी केंद्र सरकारच्या इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएम) या संस्थेच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. ही प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर आता लगेचच महापालिका प्रशासनाने आणखी रिक्त जागांसाठी पुन्हा कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कोणत्या विभागातील किती आवश्यक पदे रिक्त आहेत आणि त्यामधील किती पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. यासंबंधीचा आढावा घेण्याचे काम सेवकवर्ग विभागाकडून सुरू आहे.

ही संख्या निश्चित झाल्यानंतर लगेचच जाहिरात काढून भरती प्रक्रिया राबविली जाईल. प्रामुख्याने आरोग्य विभाग, अग्निशमन आणि अभियंता या तीन प्रमुख विभागातील दोनशेपेक्षा अधिक जागांची भरती होणार असून, डिसेंबरमध्ये या प्रक्रियेला सुरुवात होईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. अभियंत्यांची संख्या दोनशे ते अडीचशेने वाढणार महापालिकेतील अभियंत्यांची संख्याही वाढविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त कुमार यांनी दिली. मंजूर आकृतिबंधानुसार कनिष्ठ अभियंत्यांची संख्या 800 आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत महापालिकेत 34 गावांचा समावेश झाला आहे. तसेच अनेक मोठे प्रकल्प पालिकेने हाती घेतले आहेत. त्यामुळे अभियंत्यांची कमतरता आहे. त्यासाठी आकृतिबंधातील मंजूर अभियंत्यांची संख्या 25 ते 30 टक्क्यांनी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे आणखी दोनशे ते अडीचशे अभियंत्यांची भरती होईल. तसेच कार्यकारी अभियंतापदांची संख्या वाढविण्यात येणार असून, यासंबंधीचा प्रस्ताव मुख्य सभेत मंजूर करून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *