बेल्ह्यातील जेष्ठ नागरिकांना काठीचा आधार

रामदास सांगळे
विभागीय संपादक 
०७ नोव्हेंबर २०२२

बेल्हे


येथील श्रीमुक्ताई मंदिराच्या भव्य सभामंडपात ज्येष्ठ नागरीक सन्मान सोहळा, संवादयात्रा, आधारकाठी वाटप व स्नेहभोजन असा कार्यक्रम इंदिरानगर येथील रहिवाशी किसन देशमुख त्यांचे कुटूंबिय व सहकारी मित्रांनी हा आगळावेगळा सोहळा आयोजित केला होता.दहावी, बारावीचे विद्यार्थी यांचा निरोप समारंभ, माजी विद्यार्थी मेळावा असे कितीतरी मेळावे संपन्न होतात. चार-दोन तास एकमेकांना भेटतात आणि निघून जातात पण देशमुख यांनी समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी व निस्वार्थ भावना जपत जवळपास २५० ज्येष्ठ नागरीकांशी संपर्क साधून संवाद साधला आणि त्यांना फेटा, शाल व आधारासाठी काठी देऊन ज्येष्ठांप्रती आदर व्यक्त केला.

नको दुर्दशा करु माय माऊलीची ते गेल्यावर झुरशिल मनाशी असे गीत एका ज्येष्ठ महिला गात असताना त्यावेळी सर्व ज्येष्ठ पुरुष व महिलांच्या डोळ्यातून अश्रु वाहात होते. आपल्या आईवडिलांशी संवाद साधावा, काळजी घ्यावी, त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा तसेच मुलांनी आपल्या आईवडिलांना सांभाळावे ही काय सांगण्याची गोष्ट आहे का? असे शाब्दिक फटकारेही तरुणांना हभप सुरेश महाराज बुट्टे यांनी ओढले. आज अनेक घरातील वृद्ध नागरिक म्हणजे एक अडगळ ठरवले जातात. काही घरातून तर त्यांना कायमचाच बाहेरचा रस्ता दाखवला जातो. ज्या माय-बापांनी आपल्याला जन्म दिला, वृध्दावस्थेत त्यांना खरी गरज असते आधाराची पण हे न समजून घेता आजकालच्या विभक्त कुटूंबपध्दतीमुळे ज्येष्ठ नागरीकांची अवस्था केविलवाणी होत चालली आहे त्यामुळे महाराष्ट्रात वृध्दाश्रमांची संख्या वाढत चालली आहे. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन इंदिरानगर वसाहतीमधील सर्व तरुण वर्ग, सरपंच गोरक्षनाथ वाघ,उपसरपंच निलेश कणसे, माजी सरपंच विश्वनाथ डावखर, मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष जानकू डावखर,डाॕ.दत्ता खोमणे यांनी केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *