राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या दृष्टीने मुंबई ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी – आदित्य ठाकरे

१९ नोव्हेंबर २०२२


राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या दृष्टीने मुंबई ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असून त्यांना या शहराविषयी प्रेम नाही. सरकारच्या हस्तक्षेपाने पालिकेचा कारभार सुरू असून गेल्या तीन महिन्यांत या शहराच्या खच्चीकरणाचे आणि मुंबईला ओरबाडण्याचे काम सुरू आहे. पाच हजार कोटीचे रस्ते तसेच शहर सौंदर्यीकरणाच्या नावाखाली पालिकेतील पैशांची उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

मुंबई ही आमच्यासाठी जन्म आणि कर्मभूमी आहे. गेल्या अडीच वर्षांत या शहरांच्या विकासाला प्राधान्य देऊन आम्ही अनेक प्रकल्प सुरू केले. मात्र गेल्या तीन महिन्यांत राज्य सरकारने यातील अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली आहे. पालिकेत सध्या हुकूमशाही असून केवळ बदल्या, निविदा आणि वेळकाढूपणा चालला आहे. त्यामुळे शहराचे आणि पर्यायाने मुंबईकरांचे नुकसान होत असून निधीचीही उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. मुंबईतील खड्डेमुक्त रस्त्यांसाठी पाच हजार कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. पण आता ही निविदा प्रक्रियाच रद्द करण्यात आली आहे. तुमची माणसं आली नाही म्हणून निविदा रद्द केल्या का अशी विचारणाही त्यांनी केली.

शहरातील रस्ते करण्यासाठी ४२ प्रकारच्या सेवांवर काम करावे लागते, तसेच वाहतूक पोलिसांसह विविध १६ संस्थांच्या परवानग्या घ्याव्या लागतात. एकावेळी सगळय़ा रस्त्याची कामे सुरू करम्ण्यास पोलीस कधीच परवानगी देत नाहीत, त्यामुळे ही कामे टप्प्याटप्प्याने करावी लागली. मात्र त्याची माहिती सरकारला नसावी. त्यामुळे हे सगळे सोपस्कार पार पाडून तसेच नव्याने निविदा प्रक्रिया राबवून हे रस्ते पावसाळय़ापूर्वी कसे करणार, यंदाच्या पावसाळय़ात मुंबई तुंबली तर त्याला मुख्यमंत्री जबाबदार असतील, तसेच ही निविदा प्रक्रिया कोणासाठी, का रद्द करण्यात आली याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे अशी मागणीही त्यांनी केली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *