मिळकतकरातून पहिल्या सहा महिन्यात १ हजार ३०४ कोटींचे उत्पन्न महापालिकेच्या तिजोरीत जमा

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१२ ऑक्टोबर २०२२

पुणे


मिळकतकरातून पहिल्या सहा महिन्यात १ हजार ३०४ कोटींचे उत्पन्न महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलने पहिल्या सहा महिन्यात २०६ कोटींनी जास्त कर भरणा झाला आहे. तर थकबाकी वसुलीसाठी सहा महिन्यात १ हजार ५४६ मिळकती सील करण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून देण्यात आली.

यंदाच्या आर्थिक वर्षात मिळकतकर विभागाला २ हजार ४०० कोटींचे उत्पन्न प्राप्त करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. शहराच्या जुन्या आणि नव्या हद्दीत मिळून कर आकारणी होणाऱ्या अकरा लाख मिळकती आहेत. त्यातील नऊ लाख मिळकती निवासी स्वरूपाच्या तर उर्वरित दोन लाख मिळकती व्यावसायिक असल्याची नोंद महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडे आहे. अकरा लाख मिळकतींपैकी सात लाख ६० हजार ६६८ मिळकतधारकांनी १ हजार ३०४ कोटींचा कर भरणा केला आहे. गेल्या वर्षी आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत सहा लाख ९७ हजार ८६३ मिळकतधारकांनी सुमारे एक हजार ९७ कोटी ६७ लाखांचा मिळकतकर भरला होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २०६ कोटींनी उत्पन्न वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आर्थिक वर्षात २७ हजार ९५४ नवीन मिळकतींची नोंदणी करण्यात आली त्यामुळे ३३९ कोटींचे अतिरिक्त उत्पन्न महापालिकेला मिळणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *