‘एक दुखावलेला बाप’; श्रीकांत शिंदेंच्या पत्राचे पुण्यात झळकले फ्लेक्स

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०७ ऑक्टोबर २०२२

पुणे


बुधवारी ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटांचा दसरा मेळावा पार पडला. या दसरा मेळाव्यात अपेक्षेप्रमाणे दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार टीका, आरोप करण्यानं आले. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरून शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. उद्धव यांनी घरणेशाही आणि नातवावरून शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना ‘एक दुखावलेला बाप’ या आशयाचे भावनिक पत्र लिहिले होते. या पत्राचे फ्लेक्स आता पुण्यात झळकले आहेत.

उद्धव ठाकरे दसरा मेळाव्याच्या भाषणात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेत्यांवर खोचक शब्दात टीका करत म्हणाले की, बाप मंत्री, कारटं खासदार आणि नातू आता नगरसेवक पदावर डोळे लावून बसला आहे.अरे त्याला मोठा तर होऊदे शाळेत तर जाऊदे आत्ताच नगरसेवक. आता श्रीकांत शिंदेंच्या भावनिक पत्राचे फ्लेक्स पुण्यात झळकले आहेत. एक दुखावलेला बाप नावाचे फ्लेक्स पुण्यातील बालगंधर्व परिसरात लावण्यात आलेले आहे. युवा सेनेकडून  हे फ्लेक्स लावण्यात आले. शिंदे यांच्या पत्राचा मजकूर होर्डिंग्जमध्ये छापलेला आहे. श्रीकांत शिंदे पत्र लिहून म्हणाले होते की, महाराष्ट्रानं जे पाहिलं आणि तुमच्या तोंडून जे ऐकलं त्याची दखल घेऊन अत्यंत व्यथित मनानं आज तुम्हाला हे पत्र लिहीत आहे. हे पत्र माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या ‘खासदार मुला’चं नाही; हे पत्र आहे रुद्रांश श्रीकांत शिंदे या दीड वर्षाच्या निरागस, चिमुकल्याच्या ‘बापा’चं. माझं हे पत्र तुम्ही नीट, सहृदयतेनं पूर्णपणे वाचावं, अशी तुम्हाला सुरुवातीलाच हात जोडून विनंती.

पत्राच्या शेवटी श्रीकांत शिंदे म्हणाले की, एका बापाची हात जोडून, डोळ्यांत पाणी आणून विनंती. राजकारण होतच राहील हो… टीका टिप्पणी होतच राहील. पण त्यात निरागसतेला ओढू नका हो. पाप आहे हे. आणि तेही कुठेही फेडता येणार नाही असं. त्या पापाचे धनी होऊ नका. कृपा करा.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *