आगीत सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचे मंडप व डेकोरेशनचे साहित्य जळून खाक

रामदास सांगळे
विभागीय संपादक
२६ सप्टेंबर २०२२

आळेफाटा


चौदा नंबर (ता.जुन्नर) येथील विक्रम मंडप डेकोरेटरच्या गोडाऊनला सोमवारी पहाटे ३ वाजेच्या दरम्यान अचानकपणे आग लागली. या आगीत सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये किंमतीचे मंडप व डेकोरेशनचे साहित्य जळून खाक झाले. या आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही.

चौदा नंबर (ता. जुन्नर) येथे विक्रम मंडप डेकोरेटर या व्यवसायाची सुरुवात पोपट भोर यांनी ५० वर्षापूर्वी केली होती. त्यानंतर कांदळी गावचे सरपंच विक्रम भोर यांनी वडिलांनंतर अतिशय कष्टाने व कल्पकतेने मंडप व डेकोरेशनला उद्योगाचे स्वरुप दिले. छोट्या व्यवसायाचे मोठ्या व्यवसायात रूपांतर केले, आज त्यांचे नाव पुणे आणि नगर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. मोठया नेत्यांच्या सभा, मेळावे, मोठे विवाह यासाठी मंडप व डेकोरेशनचे काम विक्रम मंडप डेकोरेटर मार्फत केले जाते. चौदा नंबर येथील पुणे-नाशिक महामार्गाजवळ मंडप व डेकोरेशनचे साहित्य ठेवण्याचे गोडाऊन होते.

गोडाऊनमध्ये डेकोरेशनचे लाकडी फर्निचर, स्टेज, शाही खुर्च्या, सोफासेट, प्लायवुड, गादया, रेशमी कापड, सजावटीचे साहित्य, सीसीटीव्ही कॅमेरे असे सुमारे अडीच कोटी रुपये किंमतीचे मंडप आणि डेकोरेशनचे साहित्य होते. सोमवारी पहाटे ३ च्या वाजण्याच्या सुमारास गोडाऊनला आग लागली. या बाबतची माहिती सरपंच भोर यांना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास समजली. तोपर्यंत गोडाऊनमध्ये आगीचा भडका उडाला होता. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जुन्नर नगरपालिकेचा अग्निशमक बंब घटनास्थळी आला, तोपर्यंत सर्व साहित्य जळून खाक झाले होते.

सकाळी आमदार अतुल बेनके, सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी घटनास्थळी भेट दिली. ही घटना आकस्मित जळीत म्हणून दाखल करण्यात आली आहे. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. पोलीस स्टेशनच्या वतीने पंचनामा करण्यात येईल. वीज पारेषण कंपनीचा अहवाल मागवण्यात येईल. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक ताटे यांनी दिली.

कोरोना काळात दोन वर्षे अतिशय अडचणीत गेले होते. त्यानंतर सहा महिन्यापूर्वी व्यवसायाने पुन्हा नव्याने उभारी घेतली होती. ५० लाख रुपये खर्च करून डेकोरेशनचा नवीन सेट तयार केला होता. खूप कष्टातुन हा व्यवसाय उभा केला होता; मात्र या आगीने सर्व साहित्य जळून बेचिराख झाले आहे. आता पुन्हा नव्याने व्यवसाय उभा करणे अशक्य बनले आहे – विक्रम भोर, विक्रम मंडप डेकोरेटरचे मालक


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *