पिंपरी चिंचवड शहरातील युवती व महिलांना महापालिकेच्या सर्व रुग्णालयातून मोफत सॅनिटरी पॅडस मिळावेत-पिं चिं शहर काँग्रेस शहराध्यक्षा गिरीजा कुदळे यांचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांना निवेदन…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि ९ जून २०२१ पाच गावांचे एकत्रीकरण करुन स्थापन झालेल्या पिंपरी चिंचवड शहराचा नामोल्लेख उद्योग नगरी, कामगार नगरी, क्रिडा नगरी ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयटी हब आणि आता मेट्रोसिटी असा केला जातो. गावखेडे ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे विकसित शहर होण्यामध्ये या शहरातील कष्टकरी कामगारांबरोबरच महिला भगिनींचे योगदान ही उल्लेखनिय आहे.

आपण स्वता: ज्याप्रमाणे शहराच्या प्रथम नागरीक म्हणून शहराचा विकास आणि नावलौकिक वाढविण्यासाठी अहोरात्र काम करीत आहात. त्याचप्रमाणे शहरातील विविध कारखान्यात, लघु उद्योगात, शाळा – महाविद्यालयात, टपरी, पथारी, फेरीवाले, काच, कागद, पत्रा वेचक, घरकाम, बांधकाम या क्षेत्रात लाखो युवती व गृहिणी काम करुन योगदान देत आहेत. पंरतू शिक्षणाअभावी आणि आर्थिक टंचाईमुळे अनेक युवती व महिला आपल्या स्वता: च्या वैयक्तीक शारीरीक स्वच्छतेकडे हवे तेवढे लक्ष देऊ शकत नाहीत.

म्हणजेच आजही शहरातील अनेक झोपडपट्ट्यांतील आणि अल्प व मध्यम उत्पन्न गटातील युवती व महिला मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी पॅड आर्थिक टंचाईमुळे वापरु शकत नाहीत. त्यामुळे या महिला भगिनींना आरोग्याच्या अनेक समस्या उद्‌भवतात. आर्थिक टंचाई आणि सामाजिक कुचंबनेमुळे अनेक भगिनी हा त्रास सहन करतात.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आपल्या नेतृत्वाखाली वैद्यकीय व आरोग्य विभागासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करते. जर आपण शहरातील युवती व महिलांसाठी महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालये व दवाखान्यांमध्ये मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करुन दिले तर लाखो महिलांना यामुळे दिलासा मिळेल. तसेच महिलांचा आरोग्य निर्देशांक सुधारेल. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य समस्यांवर काही अंशी नियंत्रण मिळवता येईल. शहरातील युवती व महिलांना मोफत सॅनिटरी पॅड देण्याचा ऐतिहासिक निर्णय आपण घेऊन इतर स्थानिक स्वराज्य संस्थापुढे आदर्श निर्माण करावा अशी मागणी मी गिरीजा कुदळे (पिंपरी चिंचवड शहर महिला कॉंग्रेस शहराध्यक्षा) आपणाकडे या पत्राव्दारे करीत आहे.
आपण या महिला भगिनींच्या विनंतीचा सहानुभूतीपुर्वक विचार करावा. तसेच या ऐतिहासिक निर्णयाचे आपण शिल्पकार व्हावे असेही आवाहन आम्ही महिला भगिनी आपणास करीत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *