नारायणगाव महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनाचे उत्साहात आयोजन

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
०१ सप्टेंबर २०२२

नारायणगाव 


दि. २९ ऑगस्ट हा दिवस हॉकी खेळातील जादूगार स्व. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने ग्रामोनती मंडळाच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव येथे राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गुंजाळवाडी माध्यमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक तसेच विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम केलेले हरिश्चंद्र नरसुडे यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते.त्याप्रसंगी नरसुडे सर यांनी विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास खेळाडूंची मानसिकता आणि खेळाडू कसे घडावेत यासाठी आजपर्यंत ग्रामोन्नती मंडळाने केलेल्या प्रयत्नांची यशोगाथा मांडली. महाविद्यालयाच्या प्रत्येक विद्यार्थ्याने नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी लोकमान्य टिळक, लहुजी वस्ताद आणि महात्मा फुले यांच्या व्यायाम आणि तालमीची उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर मांडली. निरोगी शरीरामध्ये निरोगी मनाचे वास्तव्य असते. शरीरास व्याधी असेल तर मनुष्य नीट विचार करू शकत नाही . त्यासाठी प्रत्येकाने आपले शरीर सुदृढ व बळकट ठेवणे आवश्यक आहे. अभ्यासाबरोबरच मैदानी खेळ आणि व्यायामाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी इतिहास विभागातील प्रा.डॉ.लहू गायकवाड यांनी राष्ट्रीय क्रीडा दिन का साजरा केला जातो याविषयी माहिती दिली.

प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.रसूल जमादार यांनी प्रत्येकाच्या तब्येतीविषयी आरोग्य निर्देशांक कसा काढावा याविषयी मार्गदर्शन केले. क्रीडा संचालक ओंकार मेहेर यांनी यादिवशी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. महाविद्यालयातील विविध खेळ विषयक उपक्रमांची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद होता. महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत शेवाळे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की महाविद्यालयाने प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांच्या सुविधा आणि साहित्य उपलब्ध करून दिले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने त्यात सहभाग घ्यावा.

महाविद्यालयाचे क्रीडांगणावर ४०० मीटर धावण्यासाठीचा ट्रॅक उपलब्ध करून देण्यात आला आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यासाठी उप प्राचार्य प्रा. गणपत होले, कला शाखा समन्वयक प्रा. शरद कापले व इतर सर्वांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूगोल विभागाच्या प्रा. अश्विनी गायकवाड यांनी केले. तर आभार राष्ट्रीय सेवा योजना पुणे ग्रामीणचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. श्रीकांत फुलसुंदर यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *