मोशी कचरा डेपोत भाजपधार्जिन्या ठेकेदारांची मनमानी; आग लावल्याच्या संशायामध्ये सकृतदर्शनी तथ्य – अजित गव्हाणे

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०९ एप्रिल २०२२

पिंपरी


मोशी येथील कचराडेपोला आग लागली की लावली याबाबतच्या संशय कायम असतानाच आज या कचरा डेपोतील प्रशासकीय निष्काळजीपणा, ठेकेदारांचा अनागोंदी कारभार आणि भाजप नेत्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेली मनमानी आज उजेडात आली आहे. या ठिकाणचे कामकाज ठेकेदाराला ठरवून दिलेल्या नियमानुसार आणि कायद्यातील तरतुदीनुसर होत नसल्याचे दिसून आले. ठेकेदारांच्या गंभीर चुकांमुळे भ्रष्टाचारातून पैसे कमावण्यासाठी याठिकाणी कचरा विल्हेवाटाची योग्य पद्धतीने प्रक्रिया केले नसल्यामुळेच आगीचा प्रकार घडवून आणल्याचे सकृतदर्शनी समोर आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक वसंत बोराटे, सामाजिक कार्यकर्ते भरत लांडगे, माजी नगरसेविका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक विक्रांत लांडे, जालिंदर शिंदे, धनंजय आल्हाट, अरुण बोऱ्हाडे, उत्तम आल्हाट, संजय उदावंत, मंदाताई आल्हाट, कविता आल्हाट, कुणाल तापकीर यांच्यासह राष्ट्रवादीच्या विविध पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मोशी कचरा डेपोला भेट दिली. त्यावेळी अनेक अनागोंदीचे प्रकार समोर आले. यावेळी महापालिका आयुक्त राजेश पाटीलही उपस्थित होते.

कचरा डेपोला भेट दिल्यानंतर अजित गव्हाणे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, मोशी कचरा डेपोच्या आगीसंदर्भात आम्ही संशय व्यक्त केला होता. तो आता खरा ठरू लागला आहे. याठिकाणी लावलेली आग ही भाजप धार्जिण्या ठेकेदारांनी गेल्या ५ वर्षातील चुकीची कामे करून केलेला भ्रष्टाचार दडपण्याच्या हेतूनेच केल्याचा आमचा विश्वास आजच्या भेटीनंतर अधिक दृढ झाला आहे. काहीही काम न करता केवळ बिले काढण्याचे काम गेल्या पाच वर्षांत भाजप पुरस्कृत ठेकेदारांनी केले. या ठिकाणी भेट दिली असता अनेक धक्कादायक बाबी आमच्या निदर्शनास आल्या. कचऱ्याचे योग्य पद्धतीने विलगीकरण न करणे, काच, प्लास्टिक, लोखंड, तांबे विलगीकरणाचे काम ‘वेस्ट तू एनर्जी’ या प्रकल्पाच्या ठेकेदाराला दिलेले होते, मात्र त्याबाबतचे कोणतेही रेकॉर्ड या ठिकाणी उपलब्ध नसणे, या ठिकाणी महापालिकेचे कार्यरत असलेले अधिकारी हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली असल्याने ठेकेदारांची मनमानी सुरू असल्याचा प्रकारही समोर आला आहे.

भाजप सत्ताधाऱ्यांचा आशीर्वाद असल्यामुळेच महापालिकेच्या इतर अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना हे मुजोर ठेकेदार जुमानत नसल्याने संपूर्ण कचरा डेपोवरती या ठेकेदारांचेच नियंत्रण असल्याचे दिसत आहे. मोशीच्या कचरा डेपोत भाजपने ठेकेदारांच्या माध्यमातून गेली पाच वर्षे केलेली भ्रष्ट कारभाराची पापे जाळून टाकण्याचा हेतू उघड झाला आहे. या कचरा डेपोत कचरा वर्गीकरण, पृथ:करण अशी आवश्यक प्रक्रिया देखील गेली नसल्याचे सकृतदर्शनी उघड झाले आहे. ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे आणि भाजपच्या भ्रष्टाचारात सहभागी नेत्यांच्या आशीर्वादाने गेल्या पाच वर्षातील पापे झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न दिसत आहे. या प्रकरणाचे सत्य जोपर्यंत समोर येणार नाही तोपर्यंत आमचा लढा चालू ठेवणार असल्याचेही गव्हाणे म्हणाले.
कचरा डेपोतील सर्व अनागोंदी प्रकार आयुक्तांच्या लक्षात आणून दिल्यानंतर आयुक्तांनी या प्रकारची गंभीर दाखल घेतली असली तरी येत्या तीन दिवसांत त्यांनी चौकशी समिती नियुक्त न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, या नंतरच्या परिणामांना महापालिका प्रशासन जबाबदार असेल असा इशाराही अजित गव्हाणे यांनी पत्रकाद्वारे दिला.

अग्निशामक दलास कळविण्यास विलंबाचे कारण गुलदस्त्यात मोशीतील कचरा डेपोला दुपारी १२ ते १ च्या सुमारास आग लागली मात्र अग्निशामक दलाला या आगीची माहिती सायंकाळी ५ वाजलेनंतर देण्यात आल्यामुळे एवढ्या उशीराने माहिती का दिली याबाबत कोणाकडेच उत्तर मिळून आले नाही. आग मोठी होऊ देण्यात कोणाचा फायदा होता हे उघड गुपित असल्यामुळे प्रशासनही या प्रकारामध्ये संशयाची भूमिका बजावित आहे. त्यामुळे अग्निशामक दलाला उशीरा कळविण्याबाबत प्रशासनाने त्याबाबत खुलासा करावा, अशी मागणीही गव्हाणे यांनी केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *