बोरी बुद्रुक गावाची ड्रोनच्या माध्यमातून होणार शेत जमीन मोजणी

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
०१ सप्टेंबर २०२२

बोरी


राज्यात शेतजमिनीच्या तक्रारीत सध्या वाढ होत असून महसूल व शेतीच्या वादावरील असंख्य तक्रारी व न्याय निवाडे प्रलंबित आहे. पंचवीस तीस वर्षाचे या बाबतचे निकालही प्रलंबित आहेत. यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी बोरी बुद्रुक (ता.जुन्नर) येथील शेतजमीन मोजणी समितीने २०१७ साली याबाबत एक योजना आराखडा तयार करून गावातील शेतकऱ्यांसमोर मांडला. स्मार्ट विलेज प्रकल्प अंतर्गत गावातील शेत जमीन मोजणी करण्याची संकल्पना पुढे आणली, परंतु त्यावेळी अल्प प्रमाणात शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला. या समितीला पुढील काळात अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. दोन वर्ष कोरोना सारख्या महामारीमुळे वाया गेले. त्यामुळे ज्या पद्धतीने काम पुढे जाणे गरजेचे होते ते होऊ शकले नाही, परंतु मोजणी समितीने याबाबतचा पाठपुरावा भूमी अभिलेख विभागाकडे सातत्याने करत राहिले आणि त्यांच्या या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. आज रोजी बोरी बुद्रुक गावांमध्ये १६०९ हेक्‍टर क्षेत्र असून १७७७ गट आहेत, या गटापैकी १३६० गटाधारकानी मोजणी अर्ज व मोजणी फी जमा केली आहे असून उर्वरित ४१७ गटांचे अर्ज व फी लवकरच जमा होतील अशी माहिती मोजणी समितीचे रंजन जाधव यांनी दिली आहे.

संपूर्ण गावातील मोजणी रोव्हरच्या सहायाने करण्यास सुरवात आली, परंतु मोठ्या प्रमाणात अडचणी येऊ लागल्या. बोरी हे गाव जास्त प्रमाणात ऊस उत्पादन घेणारे गाव असल्यामुळे वाढलेल्या उसामुळे यामध्ये अडचणी येऊ लागल्या, यावर भूमिअभिलेख व समिती यांच्यात एक बैठक घेण्यात आली व यासाठी काय गरजेचे आहे याबाबत शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून पुढील मोजणी कशा पद्धतीने केली जाईल याबाबतची माहिती व नियोजन देण्यात आले. शेतकऱ्याने आपल्या शेतात वहिवाटी नुसार खुणा उभारण्याचे आव्हान करण्यात आले होते. शेतकऱ्यांनी उत्तम असा प्रतिसाद देत तीन दिवसांत वहीवाट खुणा उभारुन मोजणी समितीस सहकार्य केले. २९ ऑगस्ट रोजी ड्रोन मोजणी प्रारंभ करण्यात आला असून या माध्यमातून गावातील संपूर्ण शेतजमिनींचे प्रतिमा अथवा नकाशे तयार करण्यास सुरुवात करण्यात आले आहे. हे नकाशे व भूमी अभिलेख कार्यालयकडील उपलब्ध शेत जमिनीचे नकाशे जुळवले जातील आणि यानंतर कुठे कुठे अतिक्रमण आहे किंवा कुठे तफावत झाले हे पाहून शेतकऱ्यांना रोव्हर घ्या सहायाने हद्दी कायम करून दिल्या जातील. तद्नंतर पत्रक शेतकऱ्यांना दिले जातील अशी माहिती भुमिअभिलेख जुन्नर चे उपाध्यक्ष ए.एस् गांगुर्डे यांनी दिली आहे या ड्रोन मोजणीच्या शुभारंभी आमदार अतुल बेनके, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर, माजी सरपंच पुष्पा कोरडे, ग्रामपंचायत सदस्य सुनील जाधव, गणेश औटी, कोमल कोरडे साखर कारखान्याचे संचालक तबाजी शिंदे, गाव कामगार तलाठी शीतल गर्जे,रंजन जाधव, युवराज कोरडे, भुमिअभिलेख चे सर्व कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“बोरी बुद्रुक गावाने हा जो ऐतिहासिक निर्णय घेतला आहे तो अतिशय भूषणावह आहे. येणाऱ्या अडचणीना बाजूला करत आजपर्यंत येथे पोहोचला आहात, या मोजणीमुळे हद्दी कायम होऊन आप आपल्या मधील वाद कायमस्वरूपी मिटतील आणि उभ्या महाराष्ट्रात बोरी पॅटर्नच नाव घेतलं जाईल. यामध्ये समिती व शेतकऱ्यांनी योगदान दिले आहे त्या शेतकऱ्यांवर व मोजणी समितीचे अभिनंदन करतो. या बोरी पॅटर्नची ऐतिहासिक नोंद महाराष्ट्र घेईल याची मला खात्री आहे.” – अतुल बेनके,आमदार जुन्नर


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *