मुलांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देणारे पालक ही आजच्या काळाची गरज

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२६ जुलै २०२२

पिंपरी


परिस्थिती कशीही असो. मेहनत, जिद्द, चिकाटी आणि आपल्या ध्येयाप्रती प्रचंड निष्ठा असेल तर यश हमखास मिळते, हे आकांक्षाने तिच्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. कला हा मनुष्याचा खरा अलंकार आहे. मुलांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देणारे पालक ही आजच्या काळाची गरज आहे. असे मत दिशाचे अध्यक्ष नाना शिवले यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय पुरस्कारासाठी पिंपरी-चिंचवडकर आकांक्षा पिंगळे सर्वोत्कृष्ट बालकलाकाराची मानकरी ठरली. त्याबद्दल आकांक्षाचा दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आले. याप्रसंगी दिशाचे अध्यक्ष नाना शिवले, माजी अध्यक्ष गोरख भालेकर, माजी कार्याध्यक्ष सचिन साठे, खजिनदार नंदकुमार कांबळे, संचालक संतोष चांदेरे आणि आकांक्षाचे आई वडील उपस्थित होते.

ग्रामीण भागातील सुमी या मुलीने केलेली शिक्षणासाठीची धडपड आणि त्यात मिळवलेले यश, हा सुमी या चित्रपटाचा विषय असून आकांक्षा हिने सुमीची भूमिका केली आहे. तिच्या अप्रतिम भूमिकेमुळे तिला सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून यावर्षीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तर मिळाला आहेच, शिवाय सुमी या चित्रपटालाही सर्वोत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार मिळाला आहे. शिवले पुढे म्हणाले, उत्कृष्ट अभिनय, प्रचंड आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर आकांक्षाने मिळवलेले यश हे बालकलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. दिशादर्शक आहे.

सर्वोत्कृष्ट बालकलाकार आकांक्षा पिंगळे हीचा दिशाच्या वतीने सन्मान

आकांक्षाचे वडील लक्ष्मण पिंगळे यावेळी म्हणाले, प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांची आवड लक्षात घेऊन त्याला प्रोत्साहन आणि पाठबळ दिले पाहिजे. त्याच्या आवडीच्या क्षेत्रात त्याला बेस्ट करिअर करण्याची संधी देणे आणि त्याच्या पाठीशी उभे राहणे हे जर प्रत्येक पालकाने केले, तर नक्कीच मुले यशस्वी होतात.

आकांक्षा म्हणाली, माझ्या यशाचे श्रेय माझ्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहणारे माझे आई-वडील आणि ज्यांनी मला लघु चित्रपटाच्या माध्यमातून पहिली संधी दिली, त्या राज धोत्रे यांना जाते. प्रत्येक मुलांनी आपली आवड आपल्या आई-वडिलांना पटवून द्यावी. निवडलेल्या क्षेत्रात मी माझी पूर्ण क्षमता वापरून हमखास यश मिळवेल, अशा प्रकारचा विश्वास जर प्रत्येक मुलांनी आपल्या आई वडिलांना दिला, तर ते नक्कीच प्रोत्साहन देतील. सुमी या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि संपूर्ण टीम यांनी मला जे भरभरून प्रेम दिले, त्यामुळेच मी उत्तम काम करू शकले. असेही यावेळी आकांक्षाने सांगितले.